मुंबई, पुण्याहून शेगावसाठी धावणार ‘वंदे भारत ट्रेन’; भक्तांचा प्रवास होणार आरामदायी

विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी व जलद होणार आहे.

यासाठी आता लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव अशा दोन ‘वंदे भारत ट्रेन’ चालवण्याचा निर्णय होण्याची शक्यता बळावली आहे.

विदर्भाची पंढरी असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या संपूर्ण राज्यात मोठी आहे. मुंबई, पुण्यासह विशेषत: खानदेश, उत्तर महाराष्ट्रातील हजारो भाविक शेगावला नियमितपणे जात असतात. त्या पाश्‍र्वभूमीवर श्रीक्षेत्र शेगावला जाण्यासाठी पुणे, मुंबईहून ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस सुरु होण्याची शक्यता आहे.
रेल्वे प्रशासन व सरकारकडून मे २०२४ पर्यंत देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ३५ वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. यासाठी रेल्वेने प्रस्ताव मागवले आहेत. त्यानुसार शेगावला ट्रेन सुरु करण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.

त्यामुळे आता लवकरच मुंबई आणि पुणे येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा विचार आहे. यामुळे मुंबई, पुण्यासह खान्देशातील संत गजानन महाराजांच्या भक्तांना जलद व सुखकारक प्रवास ‘वंदे भारत’ने करता येणार आहे. या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे.

पुणे, मुंबईहून व्हाया जळगाव- भुसावळ

५५४ किलोमीटर अंतराच्या मुंबई ते शेगाव आणि ४७० किलोमीटरच्या पुणे ते शेगाव रेल्वे मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रस्तावावर विचार होऊन लवकरच यावर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मध्य रेल्वेमार्गावर जळगाव व भुसावळ ही महत्त्वाची जंक्शन स्थानके आहेत. या स्थानकांवरुन शेगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ‘वंद भारत ट्रेन’ला या दोन्ही स्थानकांवर थांबा मिळण्याचीही शक्यता आहे. अर्थात, त्यासाठी राज्यातील स्थानिक खासदारांना पाठपुरावा करावा लागणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने