Victory Day 1971: …अखेर पाकिस्तानने भारतासमोर शरणागती पत्करली, १९७१- विजय दिवसाचे महत्त्व काय?

विजय दिवस, दरवर्षी १६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण या दिवशी केले जाते, ही घटना शौर्य आणि बलिदानाचा पुरावा म्हणून इतिहासात कोरलेली आहे. हा वार्षिक उत्सव म्हणजे भारतीय सशस्त्र दलांच्या विजयाची एक पावती आहे. त्या युद्धाच्या १३ महत्त्वपूर्ण दिवसांमध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या आणि बलिदान दिलेल्या शूर सैनिकांना या दिवशी मनापासून आदरांजली अर्पण केली जाते.

हा दिवस का साजरा केला जातो?

विजय दिवसाचे महत्त्व १६ डिसेंबर १९७१ रोजी घडलेल्या ऐतिहासिक घटनेमध्ये आहे, या दिवशी पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लष्कर आणि बांगलादेशच्या मुक्ती वाहिनीच्या संयुक्त सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. या आत्मसमर्पणाने भारतीय इतिहासाने एक विजयी वळण घेतले. हा केवळ पाकिस्तान विरुद्ध भारताचा विजय नव्हता तर द्वितीय विश्वयुद्धाच्या समाप्तीनंतर भारताने आपले लष्करी सामर्थ्य जगासमोर सिद्ध केले होते.
युद्धाची पार्श्वभूमी

युद्धाची पार्श्वभूमी पूर्व पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद सरकारच्या विरोधात झालेल्या बंडाची आहे. मूलतः ७० च्या दशकात पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान अशी दरी निर्माण झाली होती, पूर्व पाकिस्तान म्हणजे आताचे बांगलादेश सांस्कृतिक तसेच भाषिक दृष्ट्या पश्चिम पाकिस्तानपासून भिन्न होते. त्याच कालखंडात पूर्व पाकिस्तानात शेख मुजिबूर रहमान यांच्या नेतृत्त्वाखाली अवामी लीगनं ९९ टक्के जागा जिंकून नॅशनल असेम्ब्लीत बहुमत मिळवलं. यामुळे शेख मुजिबूर रहमान यांनी पंतप्रधान पदावर आपला दावा सांगितला. तत्कालीन पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांना ते मान्य नव्हते, त्यांनी पूर्व पाकिस्तानचा अधिकार नाकारला. संघर्ष अटळ होता. पाकिस्तानने कसलीही पूर्व सूचना न देता पूर्व पाकिस्तानवर हल्ला केला. हा कालखंड बांगलादेशच्या इतिहासातील रक्तरंजित कालखंड ठरला. छळ, बलात्कार, खून यांची परिसीमा राहिली नाही. बंगाली जनतेवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या अत्याचारामुळे पूर्व पाकिस्तानमधील नागरिकांवर मानवतावादी संकट निर्माण झाले होते. याला प्रत्युत्तर देताना तत्कालीन भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्या अत्याचारातून भारतात येणाऱ्या लाखो लोकांना आश्रय दिला, तरी हे लोंढे थांबले पाहिलेत अशीही भूमिका घेतली. याचीच परिणीती ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानने ११ भारतीय हवाई तळांवर हवाई हल्ले केले तेव्हाच भारत-पाकिस्तान युद्धाची अधिकृत सुरुवात झाली.

‘बिजय दिबो’

संघर्षानंतरचे परिणाम गंभीर होते. युद्धामुळे बांगलादेशचा जन्म झाला, जो एकेकाळी पूर्व पाकिस्तान होता, त्या प्रदेशाचे औपचारिक स्वातंत्र्य निश्चित केले गेले. या युद्ध संग्रामात ३,८०० हून अधिक भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. बांगलादेशमध्ये विजय दिवस हा ‘बिजय दिबो’ म्हणून साजरा केला जातो, पाकिस्तानपासून देशाच्या मुक्तीचा उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. भारताचा निर्णायक विजय राजनैतिक परिणामांशिवाय नव्हता. ऑगस्ट १९७२ च्या सिमला करारामुळे भारताने ९३,००० पाकिस्तानी युद्धकैद्यांची सुटका केली. परंतु, काश्मीरवरील दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाकडे लक्ष न दिल्याबद्दल या कराराला टीकेचा सामना करावा लागला, भारताने कैद्यांचा वापर सौदा म्हणून करायला हवा होता, असे मतही त्यावेळेस काही राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते.

थोडक्यात, विजय दिवस हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे. हा दिवस एकता आणि भारतीय सशस्त्र दलांच्या पराक्रमाचे आणि देशप्रेमाचे प्रतीक आहे. दरवर्षी देशात या दिवसाचे स्मरण करून स्वातंत्र्यासाठी मोजलेली किंमत आणि न्याय तसेच स्वातंत्र्याच्या तत्त्वांचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने