युवराज सिंग म्हटलं की आठवतात '6 बॉल 6 सिक्स'; पाहा ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ

भारतीय क्रिकेट संघातील स्फोटक फलंदाज म्हणून युवराज सिंगची ओळख आहे. युवराज आता निवृत्त झाला असला, तरीही त्याचं नाव ऐकताच फॅन्सना आठवतात ते त्याने एकाच ओव्हरमध्ये चोपलेले सहा षटकार! आज युवराजच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या या कामगिरीचा व्हिडिओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

युवराजने 15 वर्षांपूर्वी इंग्लंडविरुद्ध एका T-20 सामन्यात हा कारनामा केला होता. या मॅचला युवराज सिंग, स्टुअर्ट ब्रॉड आणि क्रिकेट फॅन्स कधीही विसरु शकणार नाहीत. इंग्लंडच्या टीममधील खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफसोबत युवराजचा वाद झाला होता, मात्र याचा फटका स्टुअर्ट ब्रॉड या नवख्या बॉलरला बसला.
या सामन्यात टॉस जिंकून भारताने बॅटिंगचा निर्णय घेतला होता. सेहवाग-गंभीर या दोघांनीही अर्धशतक करून भारताला चांगली सुरुवात करून दिली होती. 155 धावांवर असताना टीम इंडियाला तिसरा झटका बसला, आणि क्रीजवर धोनी आणि युवराज हे दोन नवे बॅट्समन आले.

यानंतरची ओव्हर टाकण्यासाठी इंग्लिश ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ बॉलिंगला आला. यावेळी युवराजने त्याला दोन फोर मारले. यामुळे तो चिडला, आणि ओव्हर संपल्यानंतर युवराजला त्याने धमकी दिली. या दोघांमधील वाद वाढल्यानंतर अंपायर्सना मध्ये यावं लागलं. या वादामुळे आधीच संतापलेला युवराज, पुढच्या ओव्हरमध्ये बॅटिंगसाठी क्रीजवर आला. अवघ्या 21 वर्षांचा स्टुअर्ट ब्रॉड ही ओव्हर टाकणार होता.

याच ओव्हरमध्ये युवराजने सलग सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकत एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. एवढंच नाही, तर टी-20 इंटरनॅशनलमध्ये केवळ 12 चेंडूंमध्ये अर्धशतक करण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने