कोल्हापूरकरांनी अनुभवला 'उल्कावर्षाव'; तासाला 50 ते 60 उल्का पडत असल्याचं केलं निरीक्षण

कोल्हापूर : सर्वात मोठा आणि नेत्रदीपक असा उल्कावर्षाव पाहण्याचा आनंद काल (शुक्रवार) कोल्हापुरातील खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी लुटला. त्यासाठी त्यांनी आकाश निरीक्षणाचे नियोजन केले होते.

मध्यरात्री दोन वाजता साधारणतः १०० ते १२० एवढ्या उल्कांचा वर्षाव मिथुन राशीतून होण्याची शक्यता गृहीत धरून अनेकांनी आकाश निरीक्षण करण्याचे निश्‍चित केले होते. रात्री एकनंतर आकाश निरभ्र होण्यास सुरुवात झाली आणि तासाला साधारणपणे ५० ते ६० इतक्या उल्का पडतानाचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहण्याचा आनंद सर्वांनी घेतला. रात्री ८ वाजून ३० मिनिटापासून ते पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत मिथुन राशीतून होणारा उल्कावर्षाव बुधवार (ता. २०) पर्यंत पाहता येईल, असे शिवाजी विद्यापीठाच्या अवकाश संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. राजीव व्हटकर यांनी सांगितले.
सर्वसाधारणपणे उल्कापात हा पृथ्वी जेव्हा धूमकेतूच्या पट्ट्यातून जाते, तेव्हा आपल्याला दिसतो. मात्र, मिथुन राशीतून होणार उल्कावर्षाव हा धूमकेतूमुळे नसून ३२०० फेथॉन या लघुग्रहामुळे होणारा उल्कावर्षाव आहे. हा लघुग्रह मंगळ आणि गुरू ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यानच्या लघुग्रहांच्या पट्ट्यातील एक असा लघुग्रह आहे. या लघुग्रहापासून जे धुळीचे कण निर्माण होतात आणि त्याच्यातून पृथ्वी भ्रमण करते, तेव्हा दरवर्षी डिसेंबरमध्ये मिथुन राशीतून उल्कावर्षाव पाहता येतो. जेव्हा हे धुळीचे कण पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांचे वातावरणामधील हवेशी घर्षण होते आणि ते पेट घेतात.

त्यावेळी १० ते १५ सेकंदापर्यंत आपल्याला ते दिसू शकतात. साधारणतः पृथ्वीपासून १२० ते ८० किलोमीटरच्या दरम्यान त्यांचे ज्वलन होते. त्यावेळीच त्यांचा वेग ताशी ११ ते ७२ किलोमीटर सेकंद इतका असतो. त्यानंतर त्यांचे राखेत रूपांतर होते. त्यातील काही मोठ्या आकाराच्या उल्का संपूर्णपणे न जळता जमिनीपर्यंत पोहचतात, असे डॉ. व्हटकर यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने