IND vs AFG: टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचा दणका, अफगाणिस्तानवर दणदणीत विजय, मालिका जिंकली

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा टी-२० सामना इंदोरमध्ये पार पडला. टीम इंडियाच्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे यांच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानला पराभूत केलं. भारतानं ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ६ विकेटनं विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडियानं मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा टी-२० सामना १७ जानेवारी रोजी बंगळूरुमध्ये खेळवला जाणार आहे. पहिल्या मॅचप्रमाणं भारतानं आज देखील ६ विकेटनं विजय मिळवला.
इंदोरमध्ये भारतापुढे अफगाणिस्ताननं १७३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताच्या युवा खेळाडूंच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर १५. ४ ओव्हरमध्ये विजय मिळवला. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे या दोघांनी दमदार फलंदाजी केली.

यशस्वी जयस्वालनंन ३४ बॉलमध्ये ६८ धावा केल्या. त्यामध्ये त्यानं ६ षटकार आणि ५ चौकार लगावले. तर, शिवम दुबे यानं ३२ बॉलमध्ये ६३ धावा केल्या. शिवम दुबेनं ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. याशिवाय विराट कोहलीनं ३९ धावा केल्या.

तत्पूर्वी इंदोरच्या मैदानावर अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. गुलबदीन नाईबनं २८ बॉलमध्ये ५० धावा केल्या. त्यानं ३५ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. यामध्ये त्यानं ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. भारताकडून अशर्दीप सिंहनं ३ विकेट घेतल्या. रवि बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

क्लीन स्वीपची संधी

टीम इंडियाला अफगाणिस्तान विरुद्धच्या अंतिम सामन्यात विजय मिळण्याची संधी आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या तिसरा सामना बंगळुरु येथे होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला पहिल्या दोन डावांमध्ये चांगली फलंदाजी करण्यास अपयश आलेलं आहे. तिसरा सामना हा टी-२० वर्ल्डकप पूर्वीचा अखेरचा सामना असेल. त्यामुळं रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंकडून चांगल्या खेळीची भारतीय क्रिकेट चाहत्यांना अपेक्षा असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने