तर 'पंढरीची वारी' चित्रपटात जयश्री यांच्या जागी दिसल्या असत्या रंजना; पण नियती निष्ठुर झाली अन् सगळंच संपलं

मराठी सिनेसृष्टी म्हटलं की काही सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री डोळ्यांसमोर येतात ज्यांनी मराठी प्रेक्षकांची आणि चित्रपटांची नाळ एकमेकांशी जोडून ठेवली. त्यात आशा काळे, जयश्री गडकर यांसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र या सगळ्यांच्या वरचढ ठरणारी एक अभिनेत्री जिने सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ती म्हणजे अभिनेत्री रंजना. रंजना यांनी त्यांच्या अभिनयशैलीच्या ताकदीवर चक्क नटसम्राट अशोक सराफ यांनाही मागे टाकलेलं. एक स्त्री विनोद करू शकत नाही हे सरधोपट वाक्य खोटं ठरवत त्यांनी आपल्या विनोदाच्या टायमिंगने सगळ्यांनाच चकीत केलं. त्यांनी 'झुंज', 'मुंबईचा फौजदार', 'सुशीला', 'बिन कामाचा नवरा' असे अनेक चित्रपट गाजवले. मात्र एक अघटित घडलं आणि रंजना यांचं संपूर्ण आयुष्य पालटून गेलं. जर ती गोष्ट घडली नसती तर 'पंढरीची वारी' या चित्रपटात जयश्री गडकर त्यांच्याजागी रंजना दिसल्या असत्या. ३ मार्च रोजी रंजना यांचा २४ वा स्मृतिदिन होता. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तेव्हा नेमकं काय घडलं होतं.




​देवाशी जोडलेला सहजभाव​

१९८८ साली प्रदर्शित झालेल्या 'पंढरीची वारी' या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्यातील गाणी, कलाकारांचा अभिनय आणि देवाशी जोडलेला सहजभाव या सगळ्यांनी हा चित्रपट अजरामर बनला. या चित्रपट बाळ धुरी आणि जयश्री गडकर मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. मात्र हा चित्रपट रंजना करणार हे आधीच ठरलं होतं. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रमाकांत कवठेकर यांनी केलं होतं तर चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांची होती. हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेब घाटगे यांना आधीच अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

​रंजनाचा अपघात ​

या चित्रपटासाठी रंजना ही अण्णासाहेबांनी पहिली पसंती होती. चित्रपटाचं आळंदी ते पंढरपूर मार्गे असं ७० टक्के काम पूर्ण झालं होतं. या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले होते. पण त्याचदरम्यान दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगला जात असताना रंजनाचा अपघात झाला. त्यांना चालता येईना. त्यावेळी हा चित्रपट रंजनानेच करायचा असा अट्टाहास अण्णासाहेब घाटगे यांचा होता. तेव्हा अपघातानंतर रंजना यांच्यावर छोटी मोठी अशी २५ ऑपरेशन झाली होती.

​रंजना पुन्हा कधीच चालणार नाही​

प्रत्येक ऑपरेशननंतर रंजना आता चालायला लागतील असा अण्णासाहेबांना विश्वास होता. मात्र दोन वर्षे झाली तरीही रंजना अंथरुणाला खिळुन राहिल्या. अण्णांच्या सर्व नातेवाईकांनी त्यांना हा चित्रपट बनवणं सोडून देण्याचा सल्ला दिला होता. अखेरीस रंजना आता पुन्हा कधीच चालणार नाही हे कळल्यावर मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अण्णासाहेबांनी हा चित्रपट बनवण्यासाठी होता नव्हता तेवढा जवळचा सर्व पैसा खर्च केला होता.

रंजना यांची परवानगी घेऊन मग​

त्यावेळी हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेबांना तब्बल १८ लाख रुपये एवढा खर्च आला होता. त्यामुळे ते रंजना यांची वाट पाहत होते. मात्र त्यांच्या अपघाताने २ वर्ष आधीच वाया गेली होती. आता काय करायचं असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर होता. आता विठुरायासाठी चित्रपट पूर्ण करायचा हा ठाम निर्णय घेऊन दोन वर्षे वाट पाहिल्यानंतर रंजना यांची परवानगी घेऊन मग अण्णासाहेब घाटगे यांनी ही भूमिका जयश्री गडकर यांना देऊ केली. हा चित्रपट न करता येणं ही रंजना यांच्या आयुष्यातील मोठी खंत राहिली.

प्रेक्षकांना खरा विठ्ठल दिसला​

रंजना छोट्या बकुलला खांद्यावर घेऊन उभ्या असतात हे पोस्टर अखेर बदलण्यात आलं. जयश्री यांच्यासह हा चित्रपट पुन्हा चित्रित करण्यात आला. २८ डिसेंबर १९८८ रोजी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा तो दिवस उजाडला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तोबा गर्दी केली. धरिला पंढरीचा चोर ही गाणी आसमंतात दुमदुमू लागली. चिमुकल्या बकुल कवठेकरमध्ये प्रेक्षकांना खरा विठ्ठल दिसला. अण्णासाहेब यांचा मुलगा निशांत घाटगे या घटनेचा आणि संपूर्ण चित्रपटाचा साक्षीदार आहेत.

एका अभिनयपर्वाचा अंत​

हा चित्रपट करणं कदाचित रंजना यांच्या नशिबातच नव्हता. अपघाताच्या काही वर्षांनी अखेर रंजना यांनीही या जगाचा निरोप घेतला आणि एका अभिनयपर्वाचा अंत झाला. जर आज रंजना असत्या त्या मराठीतल्या मोठ्या सुपरस्टार असत्या यात तिळमात्र शंका नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने