मार्चच्या स्वागताला अवकाळी पावसाच्या सरी, हवामान विभागाचा गारपीट होण्याचा अंदाज, राज्यात कुठं पाऊस पडणार?

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असताना आज सकाळी पुण्यात रिमझिम पाऊस पडला आहे. सदाशिव पेठ, कात्रज, पर्वती, तसेच उपनगरातील काही भागांमध्ये पाऊस झाला आहे. काल दिवसभर पुण्यामध्ये कडाक्याच्या ऊन पडले असताना आज पहाटे पडलेल्या रिमझिम पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे फेब्रुवारी महिन्यात उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे काही अंशी दिलासा मिळाला.

सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या जिल्ह्यात देखील पुढील दोन ते तीन दिवसांत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, तर काही भागात गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच राज्यात मराठवाडा आणि विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील २४ तासांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसामुळे वाढलेला उन्हाचा चटका कमी होऊन पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळेल तसेच पुणे शहरात दुपारनंतर हलका पाऊस, तर काही भागांत गारपीट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळं आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भाग आणि मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडेल तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

मध्य महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडेल. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांत पाऊस पडेल. २ आणि ३ मार्चला छत्रपती संभाजीनगर भागात गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस होत आहे.

दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबईत सकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली.दुसरीकडे मुंबईतील कमाल तापमानामध्ये गेल्या चार दिवसांमध्ये दोनवेळा वाढ झाली आहे. सोमवारी मुंबईचं कमाल तापमान ३७. ५ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. तर, गुरुवारी म्हणजेच काल तापमान ३७. २ अंश सेल्सिअस इतकं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने