रिलायन्स आणि डिस्ने यांच्यात सर्वात मोठा करार; देशातील माध्यम-मनोरंजन उद्योगांना कसा होणार फायदा?

देशाच्या मनोरंजन व्यवसायातील हे सर्वात मोठे विलीनीकरण आहे. हा करार होणार असल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून सुरू होती. अखेर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. बुधवारी (२८ फेब्रुवारी) रात्री, रिलायन्स आणि डिस्नेने जाहीर केले की, आम्ही विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आता वायकॉम१८ आणि स्टार इंडियाचे विलीनीकरण (मर्जर) होणार आहे. वॉल्ट डिस्ने आणि रिलायन्स एकत्र येऊन ७०,००० कोटी रुपयांची मोठी कंपनी तयार करणार आहेत. यामुळे १०० पेक्षा जास्त टीव्ही चॅनेल, दोन मोठ्या स्ट्रीमिंग सेवा, डिस्ने + हॉटस्टार आणि जिओ सिनेमा या ओटीटी वाहिन्यांवर लोकांना मोठ्या प्रमाणात कंटेट मिळणार आहे. या करारात नेमके काय? या विलीनीकरणाचा देशाला कसा फायदा होईल? याबद्दल जाणून घेऊ.
रिलायन्स-डिस्ने यांच्यातील करार

मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्रीज आणि वॉल्ट डिस्ने कंपनी यांच्यात झालेल्या करारानुसार, रिलायन्सची व्हायकॉम१८ कंपनी डिस्नेच्या स्टार इंडियामध्ये विलीन होईल. या विलीनीकरणात रिलायन्स इंडस्ट्रीजकडे १६.३ टक्के, वायाकॉम १८ कडे ४६.८ टक्के आणि डिस्नेकडे ३६.८ टक्के हिस्सा असेल. विलीन झालेल्या संस्थेमध्ये रिलायन्स १.४ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल आणि मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या ‘जेव्ही’ या नवीन माध्यम संस्थेच्या अध्यक्षा असतील, अशी घोषणाही करण्यात आली आहे.

यासह डिस्ने इंडियाचे माजी अध्यक्ष उदय शंकर हे उपाध्यक्ष आणि धोरणात्मक सल्लागार म्हणून काम करतील, असेही सांगण्यात आले आहे. कंपन्यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे, ‘जेव्ही’ हे मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील महितीपट, लघुपट, चित्रपट आणि वेब मालिकांसाठी भारतातील एक अग्रगण्य टीव्ही आणि डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म असेल. या प्लॅटफॉर्मवर मनोरंजन क्षेत्रातील कलर्स, स्टारप्लस, स्टारगोल्ड आणि क्रीडा क्षेत्रातील स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स१८ या वाहिन्या एकत्र येतील, असे सांगण्यात आले आहे.

२०२५ पर्यंत करार पूर्ण होणार

या निवेदनात पुढे सांगितले आहे की, “जेव्ही’चे भारतभरात ७५० दशलक्षपेक्षा जास्त दर्शक असतील आणि जगभरातील भारतीयांनाही याचा लाभ घेता येईल. यासह, विलीन झालेल्या संस्थेला डिस्ने ३०,००० हून अधिक कार्यक्रमांचा परवाना देणार आहे. भारतीय ग्राहकांसाठी हा मनोरंजनाचा संपूर्ण संच असणार आहे. हा करार या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२५ च्या सुरुवातीला पूर्ण होण्याची शक्यता आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले, “हा एक महत्त्वाचा करार आहे; जो भारतीय मनोरंजन उद्योगात एका नवीन युगाची सुरुवात करेल. आम्ही जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट माध्यम समूह म्हणून डिस्नेचा नेहमीच आदर केला आहे . त्यांच्यासोबत मिळून धोरणात्मक उपक्रम तयार करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. हा करार आम्हाला आमच्या ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत मनोरंजन कार्यक्रम पोहोचविण्यात मदत करेल”, असे मुकेश अंबानी म्हणाले.

करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर, वॉल्ट डिस्ने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर म्हणाले, “भारत ही जगातील सर्वाधिक लोकसंख्येची बाजारपेठ आहे. या संयुक्त उपक्रमामुळे कंपनीसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याची संधी मिळत आहे; ज्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. रिलायन्सला भारतीय बाजारपेठ आणि ग्राहकांची सखोल माहिती आहे. आम्ही एकत्रितपणे देशातील आघाडीची मीडिया कंपनी तयार करू; ज्यातून आम्हाला डिजिटल सेवा, मनोरंजन आणि क्रीडा सामग्री ग्राहकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचवता येईल.”

रिलायन्स-डिस्ने कराराची पार्श्वभूमी

गेल्या काही काळापासून या कराराची चर्चा सुरू आहे. हे विलीनीकरण होणार असल्याच्या बातम्या गेल्या डिसेंबरपासून येत आहेत. १९९३ मध्ये भारतात आलेली डिस्ने काही वर्षांपासून अडचणीत असल्याचे चित्र आहे. भारतात डिस्नेचे स्ट्रीमिंग चॅनेल असलेल्या हॉटस्टारला इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे २०२३-२०२७ च्या स्ट्रीमिंगचे अधिकार मिळाले नाहीत. या ओटीटी वाहिनीने आपले ११.५ दशलक्ष ग्राहक गमावले, ज्याने कंपनीला धक्का बसला. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये जेव्हा वॉर्नर ब्रदर्सच्या डिस्कव्हरीने गेम ऑफ थ्रोन्स आणि सॅक्सेशनसारख्या मालिका जिओ सिनेमाच्या माध्यमातून प्रदर्शित करायला सुरुवात केली, तेव्हा कंपनीला सर्वात जास्त तोटा झाला.

रिलायन्स-डिस्ने विलीनीकरणाचे परिणाम

तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हा रिलायन्स-डिस्ने करार माध्यम आणि मनोरंजन उद्योगातील सर्वात मोठा करार म्हणून ओळखला जात आहे. हा करार भारताच्या माध्यम क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणेल. या करारात एकूण १२० वाहिन्या असतील, यात व्हायकॉम१८ च्या ४० वाहिन्यांचा समावेश आहे; ज्यात कॉमेडी सेंट्रल, निकलोडियन आणि एमटीव्हीसारख्या वाहिन्या आहेत. तर डिस्ने हॉटस्टारच्या मनोरंजन, खेळ, मुलांचे कार्यक्रम, माहितीपट, लघुपट या सर्वांचा यात समावेश आहे.

स्ट्रीमिंगचा विचार केल्यास, विलीनीकरणामध्ये डिस्ने + हॉटस्टारचे संयोजन दिसेल. ज्याचे सध्या ३८.३ दशलक्ष ग्राहक आहेत. देशातील सदस्यत्व-आधारित स्ट्रीमिंग मार्केटमध्ये डिस्ने + हॉटस्टार आघाडीवर आहे; तर जिओसिनेमा जाहिरात-समर्थित व्हिडीओ स्ट्रीमिंग मार्केटमध्ये आघाडीवर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत, जिओसिनेमाचे एका महिन्यात सुमारे २३७ दशलक्ष सक्रिय वापरकर्ते होते.

रॉयटर्सच्या एका अहवालानुसार, विलीन झालेल्या संस्थेकडे दोन लाख तासांच्या विविध कार्यक्रमांची मोठी लायब्ररी असेल; ज्यामध्ये टीव्ही वाहिन्यांवरील मालिका, चित्रपट आणि क्रीडा कार्यक्रमांचा समावेश असेल. मॉर्गन स्टँन्ले विश्लेषकांनी नमूद केले की, या नवीन संस्थेकडे काही प्रमुख क्रीडा स्पर्धांचे विशेष डिजिटल आणि प्रसारण हक्कदेखील असतील. यात पुढील चार वर्षांच्या आयपीएल, आयसीसी, देशांतर्गत भारतीय क्रिकेट, फीफा विश्वचषक, प्रीमियर लीग आणि विम्बल्डन या क्रीडा स्पर्धांचा समावेश असेल.

ब्लूमबर्ग इंटेलिजन्स विश्लेषक गीता रंगनाथन यांनी ‘टाईम्स’ ला सांगितले, “विलीनीकरणामुळे खर्चात अर्थपूर्ण बचत होऊ शकते आणि डिस्नेची सद्य परिस्थिती सुधारू शकते.” इलारा कॅपिटलचे वरिष्ठ उपाध्यक्ष करण तौरानी यांनी ‘एएफपी’ला सांगितले की, या विलीनीकरणाचा संपूर्ण माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रावर खूप मोठा परिणाम होईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने