“ब्रिटिशांनी सुद्धा…” पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लावल्यानं अरविंद केजरीवाल संतापले, महागाईवरुन भाजपाला फटकारलं!

 नवी दिल्ली : गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या राज्यात भाजपाला आव्हान देण्यासाठी आम आदमी पक्षानं कंबर कसली आहे. त्यातच गुजरातमध्ये पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी लावल्यानंतर भडकलेले आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपाचा समाचार घेतला आहे. ब्रिटिशांनी सुद्धा खाद्यपदार्थांवर कर लावला नव्हता, असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपा सरकारला फटकारलं आहे.

“केंद्र सरकारकडून आकारला जाणारा जास्त जीएसटी देशातील महागाईचं मुख्य कारण आहे. हा जीएसटी कमी करून जनतेची महागाईतून सुटका करण्यात यावी”, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. ‘गुजरात अ‍ॅपीलेट अ‍ॅथॉरिटी ऑफ अडवाँस रुलिंग’ने (GAAAR) गुरुवारी पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी मंजूर केला आहे. ‘जीएएएआर’च्या विवेक रंजन आणि मिलिंद तोरावणे यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने पराठे साधी चपाती किंवा पोळीपासून वेगळे असल्याचे नमुद केले आहे. त्यामुळे पराठे चपात्यांच्या श्रेणीत मोडले जात नसल्याचे सांगत यावर १८ टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे.



अहमदाबादेतील ‘वाडीलाल इंडस्ट्रीज’ या कंपनीने पराठ्यांवरील १८ टक्के जीएसटी कमी करण्याबाबत याचिका दाखल केली होती. ही कंपनी आठ प्रकारचे फ्रोजन पराठे तयार करते. चपाती आणि पराठे दोन्ही पिठापासून तयार होत असल्यानं यात जास्त अंतर नसल्याचे मत कंपनीने नोंदवलं होतं. त्यामुळे पराठ्यांवर १८ टक्क्यांऐवजी पाच टक्के जीएसटी आकारण्यात यावा, अशी मागणी कंपनीकडून करण्यात आली होती. मात्र, ‘जीएएएआर’ने कंपनीची मागणी फेटाळत पराठ्यांवर १८ टक्के जीएसटी कायम ठेवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने