एकनाथ शिंदेंसंदर्भातील ‘ती’ एक चूक शिवसेनेला महागात पडली; आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत

मुंबई:  युवासेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी तीन महिन्यांपूर्वी राज्यामध्ये झालेल्या बंडखोरीच्या राजकीय नाट्यमय घडामोडींबद्दल भाष्य केलं आहे. एका मुलाखतीमध्ये आदित्य ठाकरेंनी माजी सहकारी आणि विद्यमान मुख्यमंत्री असणाऱ्या एकनाथ शिंदेंसंदर्भात उद्धव ठाकरेंनी एक महत्त्वाची चूक केल्याचं मत आदित्य यांनी व्यक्त केलं आहे. बंडखोरीची कल्पना एक ते दीड वर्षांपूर्वीच आली होती असंही आदित्य यांनी म्हटलं आहे. सर्व सत्ता आणि मुख्यमंत्रीपद हाती असतानाही एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फुटून बाहेर पडले. याची पूर्वकल्पना आली नाही किंवा अंदाज बांधण्यात उद्धव ठाकरे आणि तुम्ही कमी पडलात का अशा स्वरुपाचा प्रश्न आदित्य यांना ‘मटा कॅफे’च्या कार्यक्रमामध्ये विचारण्यात आला होता. 



यावर उत्तर देताना आदित्य यांनी सविस्तर घटनाक्रम सांगताना दीड वर्षांपासूनच ठाकरे कुटुंबाला शिंदे असं काहीतरी करण्याच्या विचारात असल्याची चाहूल लागली होती असं नमूद केलं. शिंदेंच्या जवळचे लोक असतील किंवा इतर माध्यमांमधून ठाकरे कुटुंबाच्या कानावर ही कुणकुण आली होती असंही आदित्य यांनी म्हटलं. या दीड वर्षांच्या कालावधीमध्ये अनेकांनी यासंदर्भात आम्हाला इशारा देत सांगितल्याचंही आदित्य म्हणाले.आम्ही एकनाथ शिंदेंवर डोळे बंद करुन विश्वास ठेवला हीच आमची चूक झाली असं आदित्य यांनी म्हटलं आहे. “त्यांच्या (शिंदेंच्या) काही जवळचे लोक, पीए वगैरे जेलमध्ये होते की काय हे जगजाहीर आहे. पण विश्वास आपल्या माणसांवर ठेवायचा की जे येऊन सांगतात त्यांच्यावर? हा माणूस फूटू शकतो, आमच्याबरोबर येऊ शकतो असं सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? 

कदाचित यात आमची चूक झाली,” असं आदित्य यांनी म्हटलं आहे. म्हणजेच शिंदे फुटू शकतात हे सांगणाऱ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी ठाकरे कुटुंबाने शिंदेंवरच विश्वास ठेवाला असं आदित्य यांना सूचित करायचं होतं. “आम्ही या व्यक्तीवर (शिंदेंवर) विश्वास जास्त ठेवला. डोळे बंद करुन विश्वास ठेवला. सहाजिक आहे की गेल्या १५-२० वर्षात तुम्ही ज्या व्यक्तीला सगळं काही दिलं त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? ही चूक आमची झाली असेल,” असं आदित्य यांनी म्हटलं.पुढे बोलताना आदित्य यांनी युनायटेड किंग्डममधील उदाहरण दिलं. “या राजकारणात टीकायला घाणेरडं राजकारणच तुमच्या रक्तात लागतं का? की आपण हे स्वच्छ करणार आहोत राजकारण याचा विचार केला पाहिजे. जगात आपण पॅटर्न बघतो जेव्हा लक्षात येतं की युनायटेड किंग्डममध्येही चार वर्षात तीन पंतप्रधान झाले आहेत. पण अशी गद्दारी कुठेच झाली नाही की स्वत:लाच विकून टाकतो,” असा टोला आदित्य यांनी शिंदेंना लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने