संजय राऊत यांना दिलासा नाहीच; दसऱ्यानंतर दिवाळीही तुरुंगातच.

मुंबई: कथित पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाच्या ( ईडी ) अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयाने झटका दिला आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे निर्देश सत्र न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे दसऱ्या पाठोपाठ संजय राऊत यांची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे.गोरेगाव येथील कथित पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. त्यानंतर संजय राऊतांनी जामीन मिळावा यासाठी, न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज ( २१ ऑक्टोंबर ) सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलत २ नोव्हेंबरला ठेवली आहे. त्यामुळे संजय राऊतांना आजही दिलासा मिळाला नाही.



ईडीचा आरोप काय?

पत्रा चाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात संजय राऊत यांचा सुरुवातीपासूनच सहभाग असल्याचा दावा ईडीने केला आहे. या प्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केले होते. पत्रा चाळ पुनर्विकासात राऊत यांचा थेट सहभाग असून, अगदी सुरुवातीपासून ते प्रत्येक गोष्ट कृतीत आणण्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा ईडीने आरोपपत्रात केला आहे.आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्रा चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यात संजय राऊत म्हाडा अधिकारी व इतरांसह सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले. या प्रकरणात नियंत्रण राहावे म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना मोहरा म्हणून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक केले. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता, असेही ईडीने आरोपत्रात म्हटलं आहे.

ईडीवर संजय राऊतांचे धक्कादायक आरोप

दरम्यान, काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी आपल्या आईला पत्र लिहले होते. त्यामध्ये संजय राऊत यांनी ईडीवर धक्कादायक आरोप केला होता. “ईडी, प्राप्तिकर विभागाच्या भयाने बरेच आमदार खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेईमानांच्या यादीत जायचं नाही. कोणीतरी खंबीरपणे उभं राहायला हवं. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत तू आणि बाळासाहेबांनीच मला दिली आहे. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर खोटे आरोप लावले आहेत. अनेकांना बंदुकीचा धाक दाखवून माझ्याविरोधात बोगस जबाब नोंदवून घेतले आहेत,” असं संजय राऊतांनी पत्रात म्हटलं होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने