ठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ मिळाल्यानंतर शिंदे गटाचा मोठा निर्णय, निवडणूक आयोगाला पाठवला ई-मेल

 

दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षामध्ये निवडणुकीच्या आयोगाच्या निर्णयामुळे अजून भर पडत आहे. सोमवारी निवडणूक आयोगाने आणखी एक मोठा निर्णय घेतला असून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचं वाटप केल आहे. त्याआधी आयोगाने शिंदे आणि ठाकरे गटाला धक्का देत शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवलं. दरम्यान उद्धव ठाकरे गटाला नाव आणि पक्षचिन्ह मिळालं असलं तरी, शिंदे गटाला मात्र अद्याप पक्षचिन्ह मिळालेलं नाही. यासंबंधी आज आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.



शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर पक्षचिन्हासाठी तीन पर्याय ठेवले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड यांचा समावेश आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल केला असून, यामध्ये या तीन चिन्हांचा उल्लेख आहे. शिंदे गटाकडून ‘तळपता सूर्य’ चिन्हाला प्राधान्य असून, त्यासाठी आग्रह धरला जाणार आहे. दरम्यान निवडणूक आयोग सर्व शक्यता तपासून दुपारपर्यंत यासंबंधी निर्णय देण्याची शक्यता आहे.शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे ‘त्रिशूळ’, ‘उगवता सूर्य’ आणि ‘गदा’ या चिन्हांचा पर्याय दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने हे पर्याय फेटाळून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत चिन्हांचे नवे तीन पर्याय देण्याचा आदेश शिंदे गटाला दिला होता.

धन्युष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर मंगळवारी किंवा बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने