रेड कॉर्नर नोटीस प्रक्रिया गतिमान करावी ; पंतप्रधान मोदी यांचे ‘इंटरपोल’ला आवाहन.

 नवी दिल्ली : दहशतवादी, भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारांसाठी सुरक्षित ठरणारी आश्रयस्थाने नष्ट करण्यात मदत व्हावी, यासाठी ‘इंटरपोल’ने फरार गुन्हेगारांविरुद्धची रेड कॉर्नर नोटीस (आरसीएन) प्रक्रिया गतिमान करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दहशतवादी आणि गुन्हेगारांची सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करण्यासाठी जागतिक समुदायाने आणखी वेगाने काम करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.



इंटरपोलच्या ९० व्या महाअधिवेशनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते म्हणाले की,  जगाच्या विविध भागांतील गुन्हेगारांची सुरक्षित आश्रयस्थाने संपवण्यासाठी जागतिक सहकार्याची गरज आहे. या आश्रयस्थानांत भ्रष्ट लोक गुन्हेगारीतून मिळणारे पैसे सुरक्षित करण्याचा मार्ग शोधतात. ही अवैध संपत्ती बहुतेकदा जगातील काही गरीबांना लुबाडूनच उभी केली जाते व गैरकृत्यांसाठी वापरली जाते.

मोदी म्हणाले की, अंमली पदार्थापासून मानवी तस्करीपर्यंत, लोकशाहीचे अवमूल्यन करण्यापासून ते बेकायदेशीर शस्त्रास्त्रांच्या विक्रीपर्यंत, ही अवैध संपत्ती अनेक विनाशकारी गोष्टींना मदत करते. त्याला आळा घालण्यासाठी विविध कायदेशीर आणि प्रक्रियात्मक चौकटी आहेत. तथापि, सुरक्षित आश्रयस्थाने नष्ट करण्यासाठी जागतिक समुदायाने आणखी जलद कृती करणे आवश्यक आहे. भ्रष्ट, दहशतवादी,  संघटित गुन्हेगारीसाठी सुरक्षित आश्रयस्थान असूच शकत नाही. मानवतेविरुद्धच्या अशा गुन्ह्यांच्या तपासात सहकार्य वाढवण्यासाठी   आचारसंहिता तयार केली पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने