राणा-कडू वाद ‘गोड’ झाला; शिंदे फडणवीस यांच्या भेटीनंतर राणा बॅकफूटवर

मुंबई: राज्यात बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात आता राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. यासंबंधी आमदार रवी राणा यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर आता या वादावर पडदा पडला आहे.




रवी राणा यांनी बच्चू कडू यांची माफी मागत मी दिलेले शब्द मागे घेतो म्हणत हा वाद संपवला आहे. पुढं बोलताना ते म्हणाले की, मी माझे शब्द मागे घेतो, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. माझ्याकडून कोणी दुखवल असेल तर मी दिलगीरी व्यक्त करतो. त्याचबरोबर आमदार बच्चू कडू देखील त्यांचे शब्द मागे घेतील आणि मीही माझे शब्द मागे घेतो.आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटविण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतला होता. त्यादृष्टीने प्रयत्नही सुरु केले होते. रविवारी मुख्यमंत्री शिंदे तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी रवी राणा नागपूरहून मुंबईत दाखल झाले होते.

बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत गुवाहाटीला जाण्यासाठी ५० खोके घेतले, असा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यामुळे संतापलेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा यांना प्रत्युत्तर दिले होते. रवी राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले होते. तसेच वेळ पडल्यास आपण शिंदे-फडणवीस सरकारमधून बाहेर पडू, असे संकेतही दिले होते. त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या दोघांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान राणा आणि कडू यांनी एकमेकांची माफी मागून हा वाद संपवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने