रशियाने धान्याची निर्यात थांबविली

रशिया : रशियाच्या जहाजावर युक्रेनने ड्रोनद्वारे हल्ला केल्याचे कारण सांगत रशियाने आज धान्य निर्यात करार स्थगित केला. युक्रेनमधील गोदामांमधून युरोप आणि आफ्रिकी देशांमध्ये होणारी धान्याची निर्यात त्यामुळे थांबली आहे. यामुळे पुन्हा एकदा अन्नधान्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. युद्धामुळे युरोप आणि विशेषत: आफ्रिकेत धान्यटंचाई निर्माण झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने रशियाने धान्य निर्यातीबाबत करार केल्याने निर्यात सुरु झाली होती. त्याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील धान्याचे दरही उतरले होते. करारानंतर युक्रेनमधून आतापर्यंत ९० लाख टन धान्याची निर्यात करण्यात आली आहे. मात्र, काळ्या समुद्रात उभ्या असलेल्या आपल्या जहाजावर युक्रेनने ड्रोनच्या साह्याने हल्ला केल्याचे कारण सांगत निर्यात करार स्थगित केला आहे. युक्रेनने मात्र हल्ला केला नसल्याचे स्पष्ट केले असून, रशियाच्या सैनिकांनीच त्यांचा ड्रोन चुकून आपल्याच जहाजावर पाडला, असा दावा केला आहे.



धान्य निर्यातीसाठी रशियाने केलेल्या कराराची मुदत १९ नोव्हेंबरला संपत आहे. त्याला मुदतवाढ द्यावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले असतानाच रशियाने निर्यातच थांबविली आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी मात्र, रशियाचा हा ‘हंगर गेम’ असल्याची टीका केली आहे.रशियाने सप्टेंबर महिन्यापासूनच धान्याची जहाजे अडविण्यास सुरुवात केली होती. सध्या समुद्रात १७६ जहाजे अडकून पडली आहेत. रशियाच्या या आडमुठेपणामुळे आफ्रिकेत दुष्काळाचा धोका निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने