‘कांतारा’ ऑस्करसाठी पाठवा; कंगना रणौतची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत.

मुंबई :  भारताकडून यावर्षी ऑस्करसाठी पाठवलेल्या ‘छेल्लो शो’ या चित्रपटावरुन मध्यंतरी चांगलेच वाद झाले. ‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांऐवजी या गुजराती चित्रपटाला पाठवल्याने बरेच प्रेक्षक नाराज झाले होते. त्यांनी त्यांचा खेद सोशल मीडियावर व्यक्तही केला होता. आता मात्र पुढच्या वर्षीच्या ऑस्करची चर्चा आतापासून व्हायला लागली आहे. कन्नड चित्रपट ‘कांतारा’ या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवायला हवं अशी मागणी सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे.



‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला असून सगळेच या चित्रपटाचं तोंडभरून कौतूक करत आहेत. बॉलिवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कित्येकांनी या चित्रपटाचं आणि दिग्दर्शक अभिनेता रिषभ शेट्टी यांचं कौतूक केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने सुद्धा नुकताच हा चित्रपट कुटुंबाबरोबर पाहिला आणि याचं कौतूक करत तिने एक व्हिडिओदेखील पोस्ट केला. दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांचे तिने आभार मानले आणि पुढील काही दिवसतरी या चित्रपटाचा प्रभाव राहील असं म्हणत चित्रपटाची प्रशंसा केली.

आता कंगनाने नुकतंच या चित्रपटाला पुढील वर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवावे अशी विनंती केली आहे. दिग्दर्शक, अभिनेता रिषभ शेट्टीला टॅग करून कंगनाने लिहिलं, “कांतारा हा पुढील वर्षी ऑस्करसाठी भारताकडून जाणारा चित्रपट असावा. अजून हे वर्षं संपायचं आहे, आणखीनही काही उत्तम चित्रपट येतील, पण सध्या केवळ ऑस्करपेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं योग्य चित्र उभं राहणं गरजेचं आहे. आपला देश म्हणजे रहस्यं आणि जादुई गोष्टींनी समृद्ध अशी भूमी आहे. कांतारा हा चित्रपट साऱ्या जगाने अनुभवायला हवा.”केवळ कंगनाच नाही तर सोशल मिडियावर बरेच लोक या चित्रपटाला ऑस्करसाठी पाठवायला हवं असं मत व्यक्त करत आहेत. कंगनाच्या या वक्तव्यामुळे पुन्हा ती चर्चेत आली आहे. पहिले कन्नड आणि मग हिंदी आणि तेलुगूमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने १७० कोटीहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवला तर नक्की या चित्रपटाला पुरस्कार मिळेल अशी आशाही लोकांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने