घोरपडे साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू -हसन मुश्रीफ

सेनापती कापशी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना देशात सामर्थ्यशाली बनवू आणि एकरकमी एफआरपी देऊ,’ असा विश्वास संस्थापक अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या आठव्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, ‘यावर्षी एक लाख लिटर ज्यूसपासून इथेनॉलनिर्मिती आणि बायो सीएनजीचे प्रकल्प हाती घेतले आहेत. पुढील हंगामापासून दहा हजार टन क्षमतेने गाळप होईल. जिल्ह्यातील कारखाने अडचणीत असूनही एकरकमी एफआरपी देत आहेत. केडीसीसी बँक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.’अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, ‘नऊ लाख टन गाळप, सहवीज प्रकल्पामधून नऊ कोटी युनिट वीजनिर्मिती आणि सव्वा कोटी लिटर इथेनॉल निर्यातीचे उद्दिष्ट आहे. उत्पादकांनी सर्व ऊस कारखान्याला पाठवावा.'' भैया माने, जनरल मॅनेजर संजय शामराव घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. 



गणपतराव फराकटे, दिग्विजय पाटील, वसंतराव धुरे, किरण कदम, मनोज फराकटे, शशिकांत खोत, प्रवीणसिंह भोसले, काशिनाथ तेली, शिरीष देसाई उपस्थित होते. संतोष मोरबाळे यांनी आभार मानले. आमदार श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘शेतकरी संघटनेने साखर कारखान्यांवर काटामारीचा केलेला गंभीर आरोप दुर्दैवी आहे. जिथे कुठे शंका असतील तेथे शेतकऱ्यांनी वजन करूनच ऊस न्यावा. ऊस वजनाची व्यवस्था ऑनलाईन होण्याची गरज आहे.’

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने