कोल्हापूर : दसरा चौकात फ्री स्टाईल हाणामारी

कोल्हापूर : दसरा चौकात आज भरदिवसा रिक्षा थांबविण्याच्या कारणातून फ्री स्टाईल हाणामारी झाली. यामध्ये लोखंडी पट्टी, काठ्यांचा वापर झाला. गजबजलेल्या रस्त्यावर अचानक घडलेल्या या प्रकरामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. बघ्यांच्या गर्दीने वाहतुकीची कोंडी झाली. घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की हरी अशोक सुतार सुतारवाडा येथे राहतात. ते त्यांचे भाऊ शुभम, सुरेश सुतार यांच्यासोबत दुपारी दोनच्या सुमारास सुतारवाडा येथे बोलत उभे होते. दरम्यान, हरी सुतार यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका रिक्षाचालकाला थोडे थांबण्यास सांगितले. त्याचा त्याला राग आला. त्याने साथीदारांसह सुतार आणि त्यांच्या भावांना लोखंडी पट्टी व काठ्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली.



सुमारे दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला. परिसरात बघ्यांची गर्दी झाली. वाहतुकीची कोंडी झाली. लक्ष्मीपुरी पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी हरी सुतार यांनी दिलेल्या फिर्यादेनुसार शिवाजी किसन साळोखे, रोहित संभाजी साळोखे, स्वप्नील आनंदा साळोखे, नीलेश संभाजी साळोखे आणि विशाल शिवाजी साळोखे (सर्व रा. सोमवार पेठ) या पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना रात्री ताब्यात घेण्यात आल्याचे उपनिरीक्षक इक्बाल महात यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने