शिंदे गटाच्या 'बाळासाहेबांच्या शिवसेने'च्या पहिल्या शाखेचे उद्घाटन.

 मुंबई : शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटाच्या राजकीय घडामोडींनी धुमाकूळ घातला असतानाच शिंदे गटाच्या नव्या शिवसेनेने आपली पहिली शाखा उघडली आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या नामांतरानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपनेते विजय नहाटा आणि माजी विरोधी पक्षनेते विजयचौगुले यांच्या हस्ते मुंबईतील नेरूळ येथे पहिली शाखा उघडण्यात आली आहे. तर आगामी अंधेरी येथील पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये सध्या वादावादी सुरू आहे. तर निवडणूक आयोगाने काल एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव दिले आहेत. त्यानंतर आता अंधेरी येथील पोटनिवडणुकीत दोन्ही गटाकडून मोर्चेबांधणी करण्यात येत असून शिंदे गटाकडून नव्या नावाच्या पहिल्या शाखेचे उद्धाटन करण्यात आले आहे.



दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले असून शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तळपता सुर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे चिन्ह पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी एक चिन्ह शिंदे गटाला मिळणार असून त्या चिन्हावर दोन्ही गटाला अंधेरी पोटनिवडणूक लढवावी लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटाने अजून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने