महाराष्ट्रातील पुरोहितांकडून अयोध्येत वेदसेवा!

अयोध्या : श्री सद्‍गुरु ग्रुप संस्थेतर्फे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या सहकार्याने अयोध्या येथील नियोजित श्री राम मंदिर उभारणी कालावधीत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांतील वेदमंत्र पठण तसेच अन्य सुक्त - स्तोत्र पठण करून महाराष्ट्रातील पुरोहितांच्या माध्यमातून सेवा करण्यात येत आहे.‘वेद अनुष्ठान आणि सेवा योजना’ याचे औपचारिक उद्‍घाटन न्यासाचे महासचिव चंपत राय यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आमदार वेदप्रकाश गुप्ता, विक्रम प्रसाद पांडे, फुलकांत मिश्रा, तसेच चारही वेदांचे महाराष्ट्रातील प्रमुख वेदमूर्ती प्रकाश दंडगे, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, वेदमूर्ती दिनेश पेडगावकर आणि वेदमूर्ती दुर्गादास अंबुलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.



‘वेद अनुष्ठान आणि सेवा योजना’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्यातील प्रतिपदा ते पौर्णिमा आणि प्रतिपदा ते अमावस्या या प्रत्येक पंधरा दिवसांच्या कालावधीसाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील पुरोहित अयोध्या येथील श्रीराम मंदिराजवळील गणपती निवास, रामकोट येथे अनुष्ठान करणार आहेत. न्यासाचे विश्वस्त स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच पं. अतुलशास्त्री भगरे, पं. हेमंत धर्माधिकारी, दिलीप देशमुख, यशवंत कुलकर्णी, बाळकृष्ण पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर अनुष्ठानासाठी सुकाणू समितीची निर्मिती करण्यात आली.या समितीच्या मार्फत वर्षभराच्या अनुष्ठानाचे नियोजन करण्यात येत आहे. वेद अनुष्ठानासाठी जाणाऱ्या पहिल्या समूहातील वेदमूर्तींनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती करून अयोध्येकडे प्रस्थान केले. या आरतीचे नियोजन ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी केले होते.

या अनुष्ठानात सहभागी होणारे पुरोहित सेवा म्हणून हे धार्मिक कार्य करणार आहेत. ‘‘अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची सेवा करण्यासाठी मिळालेली संधी हे आमचे परमभाग्य असून श्रीराम भक्तांच्या आणि समस्त विश्वाच्या कल्याणासाठी हे अनुष्ठान करण्यात येत आहे,’ असे मत संस्थेचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.वेद हे अतिप्राचीन असून ती मानवजातीच्या जगण्याची एक शैली आहे. महाराष्ट्रातील पुरोहित अयोध्येत येऊन विश्वकल्याणासाठी अनुष्ठान करत आहेत ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. अतिशय व्यापक आणि सेवाभावी दृष्टी ठेवून हे धार्मिक कार्य होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने