“चालत गावाला जाऊ…” करोनाच्या कटू काळातील कथा सांगणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’चा टीझर प्रदर्शित

मुंबई -करोना काळ आपल्या सर्वांसाठी खूप जास्त कठीण होता. या कालावधीमध्ये रोगाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशभरामध्ये टाळेबंदी लावण्यात आली होती. याचा सर्वात जास्त त्रास खालच्या श्रेणीतील नागरिकांवर झाला. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोकांनी आपल्या जवळच्यांना गमवावे लागले. पुढे करोनाचा धोका हळूहळू कमी होत गेला आणि काही महिन्यांनी टाळेबंदी नियोजन करुन हटवण्यात आली. वयवर्ष ८० असलेल्या आजोबांपासून ते २ महिन्यांच्या त्यांच्या नातवापर्यंत सर्वांचा करोना काळातला अनुभव वेगवेगळा होता. असेच काही अनुभव एकत्र करत मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या नव्या चित्रपटाची कथा पूर्ण झाली.



या चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मराठमोळ्या सईने याआधीही काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘मिमी’ या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. ‘इंडिया लॉकडाऊन’नंतर येणाऱ्या चित्रपटामध्ये ती इमराम हाश्मीसह काम करताना दिसणार आहे. सई सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी तिने या नव्या अवतारामधला फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केला होता. या फोटोमुळे चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली होती. कमेंट करत ते सईला या लुकबद्दल विचारत होते.

नुकताच तिच्या या आगामी चित्रपटाचा टीझर लॉन्च करण्यात आला. तिने टीझरचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ट्रेलरवरुन हा चित्रपट धर्म, आर्थिक परिस्थिती, मानसिकता अशा काही मापदंडांमुळे विभागल्या गेलेल्या चार वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टींचा संगम असल्याचे लक्षात येते. व्हिडीओच्या सुरुवातीलाच २१ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा ऐकायला येते. पुढे एक-एक करत चित्रपटातील पात्रे समोर येतात. या चित्रपटामध्ये सई ताम्हणकरच्या पतीची पात्र प्रतीक बब्बरने साकारले आहे. तो एका मजूराच्या भूमिकेमध्ये साकारत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने