मध्यरात्री इंदिरा गांधींनी केली युद्धाची घोषणा... अन् पाकिस्तानचे झाले दोन तुकडे

दिल्ली : दरवर्षी १६ डिसेंबरला भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ विजय दिवस  साजरा केला जातो. १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याच्या पराक्रमसमोर ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी गुडघे टेकले होते. याच युद्धामुळे जगाचा नकाशा बदलला गेला व बांगलादेशची निर्मिती झाली. १३ दिवस चाललेल्या या युद्धात भारताने पाकिस्तानला शरणागती पत्करायला भाग पाडले. या युद्धाशी संबंधित काही महत्त्वाच्या घटना जाणून घेऊया.१९४७ ला झालेल्या फाळणीमुळे भारताला तर स्वातंत्र्य मिळाले. मात्र, याचवेळी पाकिस्तानचे पश्चिम आणि पूर्व असे दोन भाग पडले. बंगालच्या मोठ्या भागाला पूर्व पाकिस्तान असे नाव देण्यात आले होते. मात्र या भागातील नागरिकांना जवळपास २४ वर्ष पाकिस्तानच्या अत्याचाराचा सामना करावा लागला. या अत्याचाराला वैतागून अखेर पूर्व पाकिस्तानमधील नागरिकांनी बंडास सुरुवात केली. विशेष म्हणजे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देखील त्यांची साथ दिली. पूर्व पाकिस्तानमधील अनेकांना भारतात आश्रय देण्यात आला.



पाकिस्तानला एक चूक पडली महागात

३ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानने भारतीय हवाई दलाच्या स्टेशन्सवर हल्ला करण्यास सुरुवात केली. यामुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताला थेट उडी घेणे भाग पडले. बांगलादेशचा स्वातंत्र्य लढा आता भारत-पाकिस्तान युद्धात बदलला होता. इंदिरा गांधी यांनी मध्यरात्री ऑल इंडिया रेडिओवरून युद्धाची घोषणा केली होती.

'ऑपरेशन ट्राइडेंट'

भारताने या युद्धादरम्यान ऑपरेशन ट्राइडेंट लाँच केले होते. भारतीय जलक्षेत्रात फिरणाऱ्या पाणबुडींना नष्ट करण्याची जबाबदारी अँटी सबमरीन फ्रिगेट आयएनएस खुखरी आणि कृपणाला दिली होती. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय नौदलाने थेट पाकिस्तानच्या कराची येथील हवाई दलाच्या बेसवर हल्ला चढवला. या हल्ल्यात अनेक जहाज नष्ट करण्यात आले. पाकिस्तानचे ऑइल टँकर देखील नष्ट करण्यात आले. यामुळे अनेक दिवस कराची एअरपोर्ट आगीने धगधगत होते.

मुक्त वाहिनी आणि भारतीय सैनिकांसमोर पाक झुकला

पाकिस्तानविरुद्धच्या लढ्यात भारतीय सैन्याला मुक्ती वाहिनीची देखील साथ मिळाली. युद्धादरम्यान दक्षिण भागात पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला सडेतोड उत्तर दिले होते. भारतीय सैनिंकाकडून होणाऱ्या जोरदार हल्ल्यामुळे पाकला अखेर झुकावे लागले होते. लेफ्टिनेंट कर्नल भवानी सिंह यांच्या नेतृत्वाखालील १० पॅरा कमांडो बटालियनच्या सैनिकांनी पाकिस्तानमधील शहर चाचरोवर हल्ला केला होता. एकीकडे युद्धात पिछाडीवर पडत असतानाच, जागतिक पातळीवरून देखील पाकिस्तानवर दबाव वाढत चालला होता.अखेर १३ दिवस चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी सैन्याला भारतासमोर गुडघे टेकावे लागले. या युद्धामुळे जगाचा नकाशा बदलला व बांगलादेश हे नवे राष्ट्र उदयाला आले . विशेष म्हणजे जमीन हडपण्यासाठी नाही तर एखाद्या राष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी दुसऱ्या देशाने युद्धात उडी घेण्याची ही एकमेव घटना आहे. याच युद्धामुळे भारताची एक शक्तीशाली राष्ट्र म्हणून प्रतिमा निर्माण झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने