जैसा बाप वैसा बेटा! अर्जुननेही सचिनप्रमाणे इतिहास रचला; पदार्पणातच ठोकले शतक

मुंबई : अर्जुन तेंडुलकरने आपल्या पहिल्याच रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी रचत सचिन तेंडुलकरची मान अभिमानाने ताठ केली. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्ध पहिल्या डावात 178 चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. अर्जुनने देखील सचिनप्रमाणेच आपल्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी केली. सचिनने 1988 मध्ये गुजरातविरूद्ध हा कारनामा केला होता.



गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. पहिल्या दिवशी राजस्थानने गोव्याचा निम्मा संघा गारद केला होता. मात्र दिवस संपत आला असताना सुयश प्रभुदेसाई आणि रणजी पदार्पण करणारा अर्जुन तेंडुलकर यांनी गोव्याचा डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी अर्जुन तेंडुलकर 12 धावा करून नाबाद होता.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभुदेसाई आणि अर्जुनने राजस्थानच्या गोलंदाजांना चांगलेच दमवले. प्रभुदेसाईने शतक ठोकले तर अर्जुनने लंचपर्यंत अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतर अर्जुनने आक्रमक फलंदाजी करत 178 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. अर्जुन आणि सुयशने गोव्याचा डाव 5 बाद 201 धावांपासून पुढे नेला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी रचत गोव्याला 140 षटकात 410 धावांपर्यंत पोहचवले. सुयश प्रभुदेसाई हा द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने