खर्च परवडत नसल्याने पैलवानांवर गावात सराव करण्याची वेळ आली

कोल्हापूर : भारतीय खेल प्राधिकरणाचा आखाडा कोल्हापुरात अन् पैलवानांचा सराव ग्रामीण भागात, असे चित्र आहे. शहरातील महिन्याकाठीचा खर्च परवडत नसल्याने पैलवानांवर गावात सराव करण्याची वेळ आली आहे.प्राधिकरणाचा मोतीबाग तालमीत आखाडा आहे. सध्या साठ पैलवानांची नावे आखाड्याच्या कागदोपत्री आहेत. प्राधिकरणाकडून त्यांना महिन्याकाठी प्रत्येकी हजार रुपये मानधन दिले जाते. त्यात त्यांचा खुराकाचाच खर्च भागत नाही. निवासासाठी खोली घ्यायची म्हटले तर त्याचे भाडे किमान साडेतीन हजार रुपये द्यावे लागते. मॅटवरील कुस्तीसाठीचे किट, बूट यांचा खर्च वेगळाच. तो ग्रामीण भागातून शहरात कुस्ती प्रशिक्षणासाठी आलेल्या पैलवानाच्या आर्थिक कुवतीबाहेरचा आहे. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पैलवान मोतीबागेतल्या आखाड्यात सराव करतात. अन्य पैलवानांना ग्रामीण भागातील तालमींचा आधार आहे. जेथे तालमीतला आखाडा सुस्थितीत आहे व तज्ज्ञ प्रशिक्षक आहे, तेथे त्यांचा सराव जोमात सुरू आहे. राशिवडे, खेबवडे, आमशी, कुंभी-कासारी, म्हारूळ येथील पैलवान तिथल्या आखाड्यात कुस्तीचे डावपेच शिकत आहेत.



चंद्रकांत चव्हाण प्राधिकरणाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते. ते २०१५ ला सेवानिवृत्त झाल्यानंतर पद रिक्त होते. पैलवानांच्या सरावात कसूर नको म्हणून ते निवृत्तीनंतर पाच ते सहा महिने मार्गदर्शन करत होते. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षण देणे थांबवले. पद रिक्त झाल्याने पैलवानांच्या सरावाचा प्रश्‍न निर्माण झाला. या परिस्थितीत तालीम संघाचे प्रशिक्षक विजय पाटील, वस्ताद अशोक माने यांनी पैलवानांकडे लक्ष दिले. वर्षभरापूर्वी हरिश राजोरा यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. भोलानाथ पाल हंगामी प्रशिक्षक म्हणून काम पाहतात.

लोकप्रतिनिधींनी मानधन वाढीसाठी प्रयत्न करावेत

पैलवानांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याची आवश्‍यकता आहे. ती न झाल्याने पैलवान कागदोपत्री प्राधिकरणाचे पैलवान आहे. त्यांच्या मॅटवरील प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ प्रशिक्षकाची नेमणूक केली असताना त्यांना गावातील तालमीचा आधार घ्यावा लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्राधिकरणाकडे मानधन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा कुस्तीतील जाणकार व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने