जपाननं सामना गमवला पण जगभर होतंय कौतुक; आनंद महिंद्रांनीही शेअर केला फोटो

कतार: फुटबॉलचा वर्ल्डकप स्पर्धा सध्या कतारमध्ये मोठ्या उत्साहात सुरु आहे. यामध्ये काल राऊंड ऑफ 16 सामन्यात जपान आणि गतवेळचे उपविजेते क्रोएशिया यांच्यात लढत झाली. यामध्ये जपानचा पराभव झाला.या पराभवानंतर जपानच्या संघानं आणि त्यांच्या मॅनेजरनं अशी काही कृती केली की, त्यांचे चाहतेही गहिवरले. त्यांच्या या कृतीचा फोटो उद्योजक आनंद महिंद्रा यांनी शेअर केला असून त्याला कौतुकाचं कॅप्शनही दिलंय. 



आनंद महिंद्रांनी फोटो शेअर करताना म्हटलं की, या कृतीचं वर्णन केवळ दोनच शब्दांत करावं लागेल. एक आत्मसन्मान आणि दुसरा औचित्याचा आदर. टीम जपानचे मॅनेजर हाजिमे मोरियासी यांनी आपल्या चाहत्यांप्रती वाकून आदर व्यक्त केला.महिंद्रा यांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये काहींनी जपानी फॅन्सचे व्हिडिओही शेअर केले आहेत. जे आपल्या टीमला पाठिंबा देण्यासाठी आले होते. या फॅन्सनी आपल्या संघाचा पराभव झालेला असतानाही आपल्यामधील चांगुलपणाचं दर्शन घडवलं. या जपानी लोकांनी स्टेडियममध्ये झालेला रिकाम्या बाटल्यांचा आणि प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा स्वतःच्या हातानं उचलला. या व्हिडिओमुळं जपानी लोकांनी पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.जपानचे नागरिक कायमच आपल्या नम्र वागणुकीसाठी ओळखले जातात. त्याचं दर्शन नुकत्याच कतारमध्ये झालेल्या या सामन्यात झालं. यामुळं जपानी माणसाची इंटनेटच्या जगात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने