ब्राझीलचा विजय महान फुटबॉलपटू पेलेला समर्पित! लढतीनंतर पेले यांच्यासाठी प्रार्थना

कतार : सर्वाधिक पाच वेळा विश्वकरंडक जिंकणारा आणि फिफा क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या ब्राझील फुटबॉल संघाने सोमवारी मध्यरात्री झालेल्या फिफा विश्वकरंडकातील बाद फेरीच्या पहिल्या लढतीत आशिया खंडातील दक्षिण कोरियाला फुटबॉलचे धडे शिकवले. पहिल्या ३६ मिनिटांमध्ये दक्षिण कोरियाचा बचाव खिळखिळा करून त्यांनी चक्क चार गोल केले आणि सामना त्याचप्रसंगी खिशात टाकला. ब्राझीलने ही लढत ४-१ अशी जिंकत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता पुढील फेरीत त्यांना क्रोएशियाशी दोन हात करावे लागणार आहेत.



ब्राझीलच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. सातव्या मिनिटाला राफिन्हाच्या जबरदस्त खेळामुळे ब्राझीलला पहिला गोल करता आला. विनिशियस ज्युनियर याने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने डोक शांत ठेवून अव्वल दर्जाचे फिनिशिंग केले. नेमारने १३ व्या मिनिटाला पेनल्टीवर ब्राझीलचा दुसरा गोल केला. त्यानंतर २५ वर्षीय रिचार्लीसनचे अद्भुत कौशल्य जगातील फुटबॉलप्रेमींना पाहायला मिळाले. २९ व्या मिनिटाला रिचार्लोसनने बॉक्सच्या बाहेर फुटबॉलला आपल्या डोक्यावर नाचवले. त्यानंतर तो फुटबॉल पास केला. ब्राझीलच्या दोन खेळाडूंकडून तो फुटबॉल पुन्हा रिचार्लीसनकडे आला आणि त्याने अव्वल दर्जाचा गोल केला. ब्राझीलचा हा तिसरा गोल ठरला हे विशेष. ३६ व्या मिनिटाला मध्यफळीतील आक्रमक खेळाडू लुकास पाकेटा याने ब्राझीलसाठी चौथा गोल केला. पूर्वार्धात ब्राझीलने विजयाची पायाभरणी केली.

नेमार आला आणि चमकलाही

ब्राझीलला या लढतीआधी खेळाडूंच्या दुखापतीची चिंता होती. नेमारच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह होता. पण तो तंदुरूस्त झाला आणि त्याने ब्राझीलचे प्रतिनिधित्वही केले. या लढतीत त्याने आपला ठसा उमटवला. ब्राझीलला १३ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. ही पेनल्टी किक मारण्यासाठी नेमार आला. दक्षिण कोरियाचा गोलरक्षक किम स्युंगू याने नेमारचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न केले, पण नेमारने पेनल्टी मारताना वेळ घेतला आणि अलगदपणे गोलरक्षकाच्या डाव्या बाजूला फुटबॉल ढकलला.

एकमेव गोल

दक्षिण कोरियाकडून सामन्यात एकच गोल करण्यात आला. दक्षिण कोरियाला ७६ व्या मिनिटाला फ्री किक मिळाली. या किकवर त्यांना थेट गोल करता आला नाही, पण पेक स्युंधो याने मारलेल्या जबरदस्त किकवर दक्षिण कोरियाचा गोल झाला. दक्षिण कोरियाच्या खेळाडूंना गोल करण्याची जास्त संधी या सामन्यात मिळाली नाही.

दिग्गज खेळाडूसाठी सर्व काही

पेले हे ब्राझीलचे महान फुटबॉलपटू आहेत. कर्करोगाचा त्यांना आजार झाला आहे. यामधून लवकरात लवकर बरे होण्यासाठी ब्राझीलच्या खेळाडूंनी प्रार्थना केली. दक्षिण कोरियावर विजय मिळवल्यानंतर ब्राझीलच्या खेळाडूंनी पेले यांचे छायाचित्र व त्यांचे नाव असलेला बॅनर मैदानात आणला होता.

दृष्टिक्षेपात .....

  • 2 ब्राझीलने विश्वकरंडकाच्या बाद फेरीत चार गोल केले. १९९८ नंतर त्यांना अशी कामगिरी करता आली. त्यांनी चिलीविरुद्ध १९९८ मध्ये लढतीत ४-१ असा विजय मिळवला होता.

  • ब्राझीलने पहिल्या ३६ मिनिटांमध्ये चार गोल केले. साखळी फेरीच्या तीन लढतींत त्यांना फक्त तीनच गोल करता आले होते.

  • दक्षिण कोरियाला दक्षिण

  • अमेरिकेतील देशाकडून विश्वकरंडकातील सात सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • स्कॉटलंडला सर्वाधिक आठ वेळा दक्षिण अमेरिकेतील देशाकडून हार पत्करावी लागली आहे.

  • किमान तीन विश्वकरंडकांत गोल करणारा नेमार हा ब्राझीलचा तिसराच खेळाडू ठरला आहे. नेमारने २०१४, २०१८ व २०२२ मधील विश्वकरंडकात गोल केले आहेत.

  • याआधी पेले (१९५८, १९६२, १९६६ व १९७०) व रोनाल्डो ( १९९८, २००२ व २००६) यांनी किमान तीन विश्वकरंडकात ब्राझीलसाठी गोल केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने