मोदींची हत्या करायला तयार राहा म्हणणाऱ्या काँग्रेसच्या बड्या नेत्याला अटक

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना पोलिसांनी अटक केलीय. मध्य प्रदेशचे माजी मंत्री पटेरिया यांनी एका सभेत पंतप्रधानांबाबत वादग्रस्त टिप्पणी केली होती.या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी पटेरिया यांना आज (मंगळवार) सकाळी 7 वाजता पन्ना येथील राहत्या घरातून अटक केली. पटेरिया यांच्या विधानाला भाजपनं कडाडून विरोध केला आहे.




भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल

काँग्रेसचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. मात्र, अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिला आहे. मोदीजी जनतेच्या हृदयात आहेत. काँग्रेसचे लोक त्यांच्याशी मुकाबला करू शकत नाहीत, म्हणूनच काँग्रेसचा एक नेता मोदींना मारण्याची भाषा करत आहे, असंही ते म्हणाले.त्याचवेळी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी या विधानाबद्दल काँग्रेस नेतृत्वानं माफी मागावी अशी मागणी केलीय. तर, केंद्रीय मंत्री अश्विनीकुमार चौबे म्हणाले, 'मोदींना शिव्या देण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. सोनिया गांधींनी मोदींना मृत्यूचे व्यापारी म्हटले, तर विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची तुलना रावणाशी केली.'

'मोदींना मारायला तयार राहा'

संविधान वाचवायचं असेल तर मोदींना मारायला तयार राहा, असं राजा पटेरिया यांनी म्हटलं होतं. याबाबतचा व्हिडिओ सोमवारी भाजप नेते राजपाल सिंह सिसोदिया यांनी ट्विटरवर पोस्ट केला होता. या विधानावर झालेल्या गदारोळानंतर पटेरियांविरुद्ध पन्ना येथील पवई पोलीस ठाण्यात आणि जबलपूरमधील ओमटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पवई पोलिस ठाण्यात पटेरियांविरुद्ध भडकावणं, चिथावणी देणं आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या धमक्या यासह इतर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादग्रस्त विधानानंतर पटेरिया यांचं स्पष्टीकरण

पटेरिया यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. मोदींचा पराभव करण्याचा आमचा हेतू असल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी पन्ना पोलीस अधीक्षकांना एफआयआर दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पटेरिया यांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचंही ते म्हणाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने