देशाची प्रतिमा मलिन केल्यानं भारतानं WHOला खडसावलं!

नवी दिल्ली : कालच केंद्रानं मेडेन फार्माच्या कफ सिरपला क्लीनचीट दिली होती. या कफ सिरपमुळं गाम्बियात ६६ बालकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर ड्रग्ज कन्ट्रोल जनरल ऑफ इंडियानं (DCGI) जागतीक आरोग्य संघटनेला (WHO) खडसावलं आहे. WHOच्या भूमिकेमुळं भारताची प्रतिमा मलिन झाल्याचं DCGIनं म्हटलं आहे.WHOचे संचालक डॉ. रोजेरियो गॅस्पर यांना लिहिलेल्या पत्रात DCGI डॉ. व्ही जी सोमानी यांनी म्हटलं की, "गाम्बियामध्ये ऑक्टोबर महिन्यात ६६ बालकांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूंना WHOनं गडबडीत भारतीय फार्मा कंपनीचं उत्पादन असलेल्या कफ सिरपशी जोडलं होतं. यामुळं भारतीय औषध उत्पादनांच्या क्वालिटीवर उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या"



DCGIनं असंही स्पष्टीकरण दिलंय की, "माध्यमांच्या माहितीनुसार गाम्बियानं सांगितलं की, कफ सिरपचं सेवन आणि बालकांच्या मृत्यूंच्या घटनांमध्ये अद्याप कुठलाही प्रत्यक्ष संबंध आढळून आलेला नाही. तसेच ज्या बालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांनी देखील या सिरपचं सेवन केलं नव्हतं"सोमानी यांनी पत्रात म्हटलं की, गाम्बियामध्ये ६६ बालकांच्या मृत्यूशी जोडले गेलेल्या मेडेन फार्माच्या चार कफ सिरपच्या नमुन्यांची इथल्या सरकारी लॅबमध्ये चाचणी करण्यात आली. यामध्ये हे कफ सिरपचा दर्जा मानकांप्रमाणंच (Standard Quality) आहे, याची माहिती सरकारनं गुरुवारी संसदेत दिली आहे.

WHO नं काय म्हटलं होतं?

काही आठवड्यांपूर्वी WHOनं म्हटलं होतं की, बालकांच्या मृत्यूला हे कफ सिरप कारणीभूत ठरलेलं असू शकतं. WHOच्या या विधानामुळं जगभरात भारतीय फार्मा कंपन्यांवर शंका उपस्थित केल्या जात होत्या, याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने