राजधानी किव्हवर रशियाचे ड्रोन हल्ले

किव्ह : युक्रेनविरोधात आक्रमणाची धार पुन्हा तीव्र करताना रशियाने आज किव्ह या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यामध्ये पाच इमारतींचे मोठे नुकसान झाले. ड्रोन हल्ले झाल्याचे युक्रेनने मान्य करतानाच अनेक ड्रोन पाडल्याचाही दावा केला आहे. आजच्या हल्ल्यात कोणाचाही मृत्यू झाला नाही. युक्रेनमधील अनेक ठिकाणांहून रशियाच्या सैनिकांनी माघार घेतली असली तरी अद्यापही राजधानीच्या शहरावर हल्ला होऊ शकतो, हे रशियाने आज दाखवून दिले. रशियाने आज किव्हमधील निवासी भागांना लक्ष्य करत ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमुळे मोठे स्फोट होऊन इमारतींचे नुकसान झाले.




युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत हल्ल्याचा निषेध करतानाच, अनेक ड्रोन पाडल्याचा दावा केला. ‘‘रशियन दहशतवाद्यांनी आज इराणी ड्रोनच्या साह्याने पुन्हा हल्ले केले. तोफा, रणगाडे आणि रॉकेट हल्ल्यांबरोबरच गेल्या काही महिन्यांत ड्रोन हल्ल्यांचीही संख्या वाढली आहे,’’ असे झेलेन्स्की म्हणाले. या हल्ल्यांनंतर पुन्हा हल्ले न झाल्याने शहरात तणावपूर्ण शांतता होती. रशियाच्या ड्रोन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी युक्रेनला संरक्षण यंत्रणा पुरविली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने