फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को, जपान बलाढ्य युरोपिय देशांपुढे आपापल्या गटांत अव्वल कसे राहिले?

कतार: कतार येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीचे चित्र स्पष्ट झाले आहे. यंदाच्या स्पर्धेत काही संघांनी अनपेक्षित कामगिरी करताना बलाढ्य संघांना धक्का दिला आहे, तर काही संघांनी जेतेपदाच्या अपेक्षा फोल ठरवल्या आहेत. एकीकडे मोरोक्को आणि जपानसारख्या संघांना बाद फेरी गाठण्यात यश आले. दुसरीकडे त्यांच्याच गटात असलेल्या बेल्जियम आणि जर्मनी यांसारख्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. साखळी फेरीतच गारद होण्याची जर्मनीची ही सलग दुसरी वेळ ठरली. तुलनेने दुबळ्या संघांनी या बलाढ्य संघांच्या वर्चस्वाला कसा धक्का दिला, याचा घेतलेला आढावा.

जपानने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष कसे वेधले?

विश्वचषकासाठी जपानचा ई-गटात समावेश होता. या गटात स्पेन, जर्मनी आणि कोस्टा रिका हे अन्य संघ होते. जपानने आपल्या पहिल्याच सामन्यात चार वेळच्या विश्वविजेत्या जर्मनी संघाला २-१ अशा फरकाने नमवले होते. यानंतर त्यांनी कोस्टा रिकाकडून ०-१ अशी हार पत्करली. मात्र, अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी स्पेनचा २-१ अशा फरकाने पराभव करत पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली. या कामगिरीसह त्यांनी बाद फेरी गाठली. जपानच्या या वाटचालीत सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडली ती त्यांचा आघाडीपटू रित्सु डोआनने. संघाच्या दोन्ही महत्त्वपूर्ण विजयात त्याने निर्णायक योगदान दिले आहे. त्याने दोन्ही सामन्यांत गोल केले. जपानचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, जर्मनी आणि स्पेनविरुद्ध एका गोलने पिछाडीवर राहूनदेखील त्यांनी अवघ्या काही मिनिटांत दोन गोल करत संस्मरणीय विजय मिळवले.

मोरोक्कोच्या कामगिरीने अनेकांच्या भुवया का उंचावल्या?

यंदाच्या विश्वचषकात मोरोक्कोच्या कामगिरीची बरीच चर्चा होत आहे. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात मोरोक्कोने क्रोएशियाला गोलशून्य बरोबरीत रोखले. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या सामन्यात मजबूत समजल्या जाणाऱ्या बेल्जियम संघावर २-० अशा फरकाने विजय मिळवत धक्कादायक निकाल नोंदवला. अखेरच्या साखळी सामन्यातही त्यांनी कॅनडावर २-१ अशी मात करत फ-गटात अव्वल स्थान मिळवत आगेकूच केली. मोरोक्कोने तब्बल ३६ वर्षांनी विश्वचषक फुटबॉलच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. मोरोक्कोच्या यशात हकिम झियेशने निर्णायक भूमिका बजावली आहे. पुढच्या फेरीत मोरोक्कोसमोर स्पेनचे आव्हान असणार आहे.



जर्मनीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव का?

यंदाच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत जर्मनीचा ई-गटात सहभाग होता. जर्मनीचा संघ किमान बाद फेरीत पोहोचेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, यंदाही त्यांनी निराशा केली. २०१८ मध्येही त्यांना बाद फेरीत पोहोचता आले नव्हते. त्यामुळे त्यांच्या निराशाजनक कामगिरीचा कित्ता या विश्वचषक स्पर्धेतही कायम राहिला. यंदा मॅन्युएल नॉयरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या जर्मनीला साखळी फेरीत अवघ्या एकाच सामन्यात विजय मिळवता आला. निक्लस फुलक्रुग, जमाल मुसियाला वगळता इतर कोणालाही फारशी चमक दाखवता आली नाही.अनुभवी आघाडीपटू थॉमस मुलरचीही चुणूक यंदाच्या स्पर्धेत पाहायला मिळाली नाही. जर्मनीचे बचावपटू ॲन्टोनिओ रुडिगर, निक्लस सुले, थिलो केरेर यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. प्रशिक्षक हॅन्सी फ्लिकही संघाची मोट व्यवस्थित बांधण्यात अपयशी ठरले. त्यामुळे संघ म्हणून जर्मनी या स्पर्धेत अयशस्वी ठरला. जपान आणि स्पेनविरुद्ध त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले. त्यामुळे त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागले. त्यांनी कोस्टा रिका संघावर विजय मिळवला, पण बाद फेरी गाठण्यासाठी तो पुरेसा नव्हता.

बेल्जियमनेही विश्वचषक स्पर्धेत निराशा का केली?

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियम संघालाही या वेळी चमक दाखवता आली नाही. या वेळी बेल्जियमचा फ-गटात समावेश होता. मोरोक्कोसारख्या संघाकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यांनी कॅनडावर १-० असा निसटता विजय मिळवला. अखेरच्या लढतीत विजय अनिवार्य असताना क्रोएशियाविरुद्ध त्यांना गोलशून्य बरोबरीवरच समाधान मानावे लागले. या स्पर्धेत त्यांना अवघा एक गोल करण्यात यश आले. तर, मोरोक्कोसारख्या संघाकडून त्यांना दोन गोल खावे लागेल. रॉबेर्टो मार्टिनेझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या बेल्जियम संघाने या स्पर्धेत सर्वच आघाड्यांवर निराशा केली.अनेक चांगले आघाडीपटू असतानाही त्यांना गोल करण्यात अपयश आले. त्यांच्या बचाव फळीलाही प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना रोखण्यात अपयश आले. क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी वाया घालवल्या. आघाडीपटू इडन हझार्ड, लेआंड्रो ट्रोसार्ड, मध्यरक्षक केव्हिन डीब्रूएने यांनी निराशा केली. रोमेलू लुकाकूला दुखापतीमुळे एकही सामना सुरुवातीपासून खेळता आला नाही. क्रोएशियाविरुद्ध तो गोल करण्यात चुकला. याचा बेल्जियमला अखेरीस फटका बसला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने