महात्मा गांधीजींच्या वैयक्तिक सल्लागार ते देशाच्या पहिल्या आरोग्यमंत्री; कसा होता डॉ. सुशीला नायर यांचा प्रवास!

मुंबई: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, गांधीवादी नेत्या,लेखिका  डॉ. सुशीला नायर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील गुजरात जिल्ह्यातील कुंजाह या छोट्या गावात झाला. लाहोर येथे महात्मा गांधी आले होते त्यावेळी त्यांनी त्यांची भेट घेतली होती. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी दिल्ली येथे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.एमबीबीएस आणि एमडी या पदव्या मिळविल्या. त्या सन 1939मध्ये त्यांचे बंधू प्यारेलाल नायर यांच्याबरोबर वर्धा येथे आल्या. त्या म. गांधी यांच्या कठोर परिश्रम व तत्त्वज्ञान यामुळे प्रभावित झाल्या होत्या.डॉ. सुशीला यांनी गांधींच्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला. जेव्हा वर्धा येथे गेल्या त्यावेळी तेथे कॉलराची साथ पसरली होती. त्या परिस्थितीत त्यांनी रुग्णांवर उपचार केले. महात्मा गांधीजींनी त्यांच्या या कामाचे कौतुक केले. आपला खाजगी वैद्यकीय सल्लागार म्हणून सुशीलाजींची नेमणूक केली.वर्धा हे गांधीजींचे प्रमुख वसतिस्थान झाले होते. स्वातंत्र्य लढ्याबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय येथे होत असत. त्यामुळे अनेक गांधीवादी नेत्यांची तेथे वर्दळ वाढली होती. साहजिक त्याही स्वातंत्र्यलढ्यामध्ये सक्रिय झाल्या होत्या. छोडो भारत चळवळीत बापू आणि कस्तुरबा यांच्याबरोबर सुशिला यांचाही सहभाग होता. या आंदोलनामूळे पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते.



महात्मा गांधींच्या हत्येनंतर सुशीला नायर अमेरिकेत गेल्या आणि तेथे त्यांनी जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधून सार्वजनिक आरोग्यसेवेची पदवी घेतली. परत आल्यावर त्यांनी फरिदाबाद येथे क्षयरोग सेनेटोरियमची स्थापना केली.गांधीजींच्या सोबत राहिल्याने त्यांच्या विचारांचा सुशीला नायर यांच्यावर प्रभाव होता. तसंच गांधींच्या तत्त्वांना पुढे नेण्यातही त्यांचा विश्वास होता. त्याचनुसार डॉक्टरकीचा अभ्यास करणाऱ्या डॉक्टरांना त्यांनी ग्रामीण भारतात सेवा देण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक सेवेचा हा फक्त एक पैलू आहे. ज्यामध्ये डॉ. सुशीला  सार्वजनिक आरोग्यासाठी पूर्णपणे समर्पित होत्या.गांधी विचाराचा पगडा असल्याने त्या स्वस्थ बसल्या नाहीत. त्या राजकारणात सक्रिय झाल्या. 1952 ते 1956 या कालावधीमध्ये त्या दिल्ली विधानसभेच्या सदस्या होत्या. तर, 1957, 1962, 1967 या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्या झाशीमधून कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. वर्ष 1962 ते 1967 या कालावधीमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री पदही सांभाळले होते. 1969 साली वर्धा येथे त्यांनी महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेमार्फत ग्रामीण भागातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले.

 

संसदेत महिला हक्कांसाठी लढा

डॉ. सुशीला नायर यांच्या राजकीय कारकीर्दीत महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला. स्वतंत्र भारतात अनेक बदल घडवून आणने तेव्हा गरजेचे होते. संविधानाने जरी स्त्री-पुरुषांना समान हक्क दिले असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात कमतरता होती.महिलांनी कमावलेल्या पगारावर त्यांचाच जास्त अधिकार आहे. पण, सगळीकडे पुरुषांना प्राधान्य दिले जाते. आणि महिलांना दुर्लक्षित केले जाते असे का? स्त्रियांच्या सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी पुरुषांमध्ये स्त्री चेतनेचा लोकशाही पद्धतीने विकास का होत नाही? , असा खडा सवाल त्यांनी त्याकाळात उपस्थित करून पुरूषप्रधान संसदभवन दणाणून सोडले होते. राजकारणातून निवृत्ती घेऊन सेवाग्राम येथील कार्यास वाहून घेतले. 3 जानेवारी 2001 रोजी हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने