‘गांधी-गोडसे’ या विचारधारांमधील युद्ध उलगडणार मोठ्या पडद्यावर; चित्रपटातून प्रसिद्ध दिग्दर्शकाचं ९ वर्षांनी पुनरागमन

मुंबई: स्वातंत्र्यापासूनच आपल्या देशात गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्ध आपण बघत आलो आहोत. बऱ्याच कलाकृतीमधून यावर भाष्यदेखील करण्यात आलं आहे. ‘मी नथुराम गोडसे’ बोलतोय हे शरद पोंक्षे यांचं नाटक रंगभूमीवर चांगलंच गाजलं, शिवाय महात्मा गांधी यांच्यावरदेखील बरेच चित्रपट बनले. आता याच २ विचारधारांमधील युद्ध पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.



८० चं दशक ज्या दिग्दर्शकाने गाजवलं तेच आता या विषयावर एक नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहेत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. नुकतंच या चित्रपटाची घोषणा झाली असून सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे.तब्बल ९ वर्षांनी राजकुमार संतोषी हे दिग्दर्शक म्हणून समोर येणार आहेत. राजकुमार संतोषी यांनी ‘दामिनी’, ‘घातक’, ‘घायल’, खाकी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’ अंदाज अपना अपना’सारखे अजरामर चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा ते एका ज्वलंत विषयाला घेऊन आपल्यासमोर येत असल्याने याची चांगलीच चर्चा आहे.

या चित्रपटाबद्दल फारशी माहिती अजून समोर आलेली नाही. पवन चोप्रा आणि मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर या चित्रपटाचा भाग असणार आहे अशी माहिती समोर आली आहे. खुद्द चिन्मय मांडलेकरनेही त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. पुढच्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने