सोन्याच्या दराला झळाळी! लवकरच सोने गाठणार 60 हजारांचा पल्ला...

जळगाव : यंदाची दिवाळी सोने खरेदीसाठी व गुंतवणूकदारांसाठी फायद्याची ठरली आहे. दिवाळीत सोने, चांदीचे दर आताच्या दरापेक्षा फारच कमी होते. महिन्याभरापूर्वी सोने, चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रतितोळा तीन हजारांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो साडेपाच हजारांची वाढ झाली आहे. आगामी काळात सोन्याचे दर प्रतितोळा साठ हजारांचा टप्पा गाठेल, असा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे. आज सोने ५३ हजार ८०० प्रतितोळा, तर चांदी ६५ हजारांवर पोचली आहे.

गेल्या महिन्यात सुरू झालेल्या लग्नसराईमुळे सोन्याला प्रचंड मागणी होत आहे. सुवर्ण व्यावसायिकांच्या अनुभवानुसार सोने, चांदीच्या दरात हवीतशी भाववाढ होत नव्हती. आता चांगला दर सोने, चांदीला मिळाला आहे. दिवाळीत सोने, चांदीचा दर कायम होता. सोन्याचा दर प्रतितोळा ५१ हजार, तर चांदीचा प्रतिकिलो ५९ हजार होता. तोच दर पाडवा, भाऊबीजेनंतर २८ ऑक्टोबरपर्यंत कायम होता. २९ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात दोनशे, तर चांदीच्या दरात पाचशेची घट झाली होती. ४ नोव्हेंबरला सोने प्रतितोळा ५० हजार ८००, तर चांदी ५९ हजार ५०० (जीएसटीविना) होते. १८ नोव्हेंबरला सोन्याचे दर प्रतितोळा ५२ हजार ५००, तर चांदी ६२ हजारांपर्यंत (जीएसटी) पोचले होते.२५ नोव्हेंबरला चांदीत तब्बल दीड हजारांची वाढ होऊन चांदी ६३ हजार ५०० पर्यंत पोचली होती. १ डिसेंबरपासूनही सोने-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यादिवशी सोने ५३ हजारांवर, तर चांदी ६४ हजारांवर पोचली.



काही दिवसांतील दर असे (जीएसटीविना)

तारीख -- सोने प्रतितोळा -- चांदी प्रतिकिलो

४ नोव्हेंबर--५० हजार ८०० -- ५९ हजार ५००

१८ नोव्हेंबर -- ५२ हजार ५०० -- ६२ हजार

२२ नोव्हेंबर--५२ हजार ५००--६३ हजार

२५ नोव्हेंबर--५२ हजार ८००--६२ हजार

१ डिसेंबर--५३ हजार--६४ हजार

४ डिसेंबर --५३ हजार ८००--६५ हजार

''लग्नसराई सुरू आहे, त्यामुळे सोन्याला प्रचंड मागणी आहे. अनेक महिन्यांपासून सोने, चांदीच्या दरात हवीतशी वाढ झालेली नव्हती. ऐन दिवाळीतही सोन्याचा दर एकसारखा होता. दराची तेजी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असतात. दरातील वाढ थांबून होती. आज अचानक वाढ झाली. आगामी काळातही सोने, चांदी तेजीतच राहील.''

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने