'त्या' व्हिडीओमुळे मराठा संघटना आक्रमक; अधिवेशनात राऊतांच्या अटकेची मागणी करणार

मुंबई : महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भाजपा नेत्यांच्या विधानाविरोधात दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीकडून महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचा व्हिडीओ शेअर केल्याने संजय राऊत अडचणीत आले आहे.संजय राऊत यांनी एक व्हिडीओ ट्वीटरवरुन शेअर केला होता. आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं, "देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही." पण हा व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.




या व्हिडीओवरुन भाजपासह मराठा संघटनाही आक्रमक झाल्या आहे. संभाजीराजे छत्रपती यांचया स्वराज्य संघटनेने याप्रकरणी संजय राऊत यांच्या विरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाकडूनही तक्रार दाखल करण्यात आली आहे.मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. मराठा क्रांती मोर्चाकडून नागपूर अधिवेशनातही पदाधिकारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतील आणि संजय राऊत यांना अटक करण्याची मागणी करणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने