खेळण्यानंतर आता मुकेश अंबानींची रिलायन्स कंपनी विकणार चॉकलेट!

मुंबई : मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीनं 'लोटस चॉकलेट'मध्ये 51 टक्के कंट्रोलिंग स्टेक विकत घेतला आहे. हा करार 113 रुपये प्रति शेअर या भावानं झाला असून त्याची एकूण रक्कम 74 कोटी रुपये आहे. Reliance Consumer Products Limited (RCPL) नं चॉकलेट्स, कोको उत्पादनं आणि कोको डेरिव्हेटिव्ह्ज बनवणाऱ्या लोटस चॉकलेटच्या (Lotus Chocolate) प्रवर्तकांसोबत करार केला आहे. शेअर खरेदी करारांतर्गत RCPL नं लोटस चॉकलेटच्या पेड-अप शेअर कॅपिटलपैकी 77 टक्के संपादन केलं आहे. कंपनीचे प्रवर्तक प्रकाश पेराजे पै आणि अनंत पेराजे पै यांच्याकडून शेअर बाजारात खरेदी केली जाणार आहे. यानंतर, रिलायन्स LOTUS च्या सार्वजनिक भागधारकांसाठी 26 टक्के खुली ऑफर आणेल.



रिलायन्स कंपनी LOTUS चे 65,48,935 इक्विटी शेअर्स विकत घेईल, जे कंपनीच्या विद्यमान प्रवर्तक आणि प्रवर्तक गटाचा 51 टक्के हिस्सा आहे. दरम्यान, व्यवहाराच्या शेवटी बीएसई निर्देशांकावर लोटस चॉकलेटच्या शेअरची किंमत 117.10 रुपये होती. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल रु. 150 कोटी आहे.कार्यकारी संचालिका इशा अंबानी या कराराबद्दल म्हणाल्या, 'रिलायन्स लोटससोबत भागीदारी करण्यास उत्सुक आहे. ज्यांनी कोको आणि चॉकलेट डेरिव्हेटिव्ह व्यवसाय उभारला आहे. लोटसमधील गुंतवणूक दैनंदिन वापरातील स्वदेशी विकसित उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी, ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार उत्पादनं देण्यासाठी आमची वचनबद्धता अधोरेखित करते. आम्ही लोटसच्या अत्यंत अनुभवी व्यवस्थापन कार्यसंघासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. कारण, आम्ही व्यवसायाचा आणखी विस्तार करत आहोत.'

लोटसचे संस्थापक-प्रवर्तक अभिजित पै म्हणाले, 'रिलायन्ससोबत या भागीदारीत प्रवेश करताना आम्हाला आनंद होत आहे. सर्वोत्कृष्ट उत्पादन क्षमता आणि प्रतिभा यांच्या आधारे ग्राहक विभागांमध्ये जागतिक दर्जाच्या मिठाई उत्पादनांचा व्यवसाय तयार करण्याचा आमचा दृष्टीकोन आहे. या गुंतवणुकीद्वारे रिलायन्ससोबतची आमची धोरणात्मक भागीदारी ही दृष्टी आणखी सक्षम करेल आणि लोटसला गती देईल.'

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने