पाटलांवर शाई फेकली, खुनाचा प्रयत्न; शरद पवारांना…; जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. कालच पवारांचा वाढदिवस झाला, त्यानंतर लगेचच हा धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पवारांना धमकी देणाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यावरून पुन्हा सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे.शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली. आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने जीवे मारणार असल्याची धमकी दिली. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.



शरद पवार यांच्या निवासस्थानी फोन करणाऱ्या व्यक्तीने हिंदीतून ही धमकी दिली. तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात २९४, ५०६ (२) भादंवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, "पवार साहेबांना जिवे मारण्याची धमकी... अदखलपात्र गुन्हा, चंद्रकांत पाटलांवर फेकलेली शाई... खुनाचा प्रयत्न" भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. यानंतर घटनास्थळावरील ११ पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. तर शाईफेकणाऱ्यांवर ३०७ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नेमकं काय झालं होतं?

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार राजकारण तापलं .यानंतर पिंपरी-चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्यावर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याकडून शाईफेक करण्यात आली. या कार्यकर्त्यांवर कलम ३०७ म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि १२० ब, शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप आणि सरकरवर जोरदार टीका झाली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने