युक्रेनशी चर्चेच्या भूमिकेचा मोदी यांच्याकडून पुनरुच्चार

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी शुक्रवारी दूरध्वनीवरून चर्चा केली. युक्रेन- रशिया संघर्षावर तोडग्यासाठी राजनैतिक माध्यमातून संवाद हाच एकमेव मार्ग असल्याच्या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात रशियाच्या सहकार्याची अपेक्षा मोदी यांनी बोलून दाखविली. या संघटनेच्या शिखर परिषदेदरम्यान व त्यानंतर समरकंद येथेही दोन्ही नेत्यांची अलीकडेच भेट झाली होती. त्यापार्श्वभूमीवर दूरध्वनीवरील चर्चेत उभय नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांबाबत विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. यात ऊर्जा सहकार्य, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य अशा प्रमुख क्षेत्रांचा समावेश होता.



भारताकडे असलेले जी-२० समुहाचे अध्यक्षपद आणि या कार्यकाळात शिखर परिषद तसेच अन्य कार्यक्रमांबाबत मोदी यांनी पुतीन यांना माहिती दिली. भारताच्या प्राधान्याचे मुद्देही त्यांनी अधोरेखित केले. शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उभय देश एकत्र काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी एकमेकांच्या नियमित संपर्कात राहण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने