'10 मिनिटात 'डंकी' चं शूट बंद केलं नाहीत तर..', शाहरुख विरोधात जबलपूरमध्ये मोठा राडा..

मुंबई: शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' सिनेमावरनं मोठा वाद देशभरात पेटला आहे. शुक्रवारी करणी सेनेच्या सदस्यांनी आणि काही हिंदू संघटनांच्या एका समूहानं 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यातील दीपिकाच्या भगव्या रंगाच्या बिकिनीचा जोरदार विरोध केला. आता शाहरुखने आपल्या 'डंकी' सिनेमाच्या शूटिंगला देखील सुरुवात केली आहे,त्यामुळे आता 'पठाण' च्या वादामुळे लोक 'डंकी' सिनेमावरही आगपखड करताना दिसत आहेत. जबलपूर जवळ भेडाघाट मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत शाहरुखच्या 'डंकी' सिनेमाच्या शूटिंगला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला.






जबलपूरमध्ये शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' सिनेमाचं शूंटिग सुरू होतं. यादरम्यान लोकांनी पठाणचा राग या सिनेमाच्या शूटिंगवर काढल्याचं समोर आलं आहे. हातात काळे आणि भगव्या रंगाचे झेंडे घेऊन करणी सेनेच्या सदस्यांनी कितीतरी तास घोषणाबाजी केली आणि हनुमान चालीसा जोरजोरात म्हटली. या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भेडाघाट परिसरात मोठ्या संख्येनं पोलिस तैनात करण्यात आले. निदर्शन करणाऱ्यांनी आव्हान देत म्हटलं की, ''डंकी च्या निर्मात्यांनी जर १० मिनिटांत शूट बंद केलं नाही तर चांगले परिणाम होणार नाहीत''. पण या धमकया मिळाल्या नंतरही 'डंकी' च्या टीमनं आपल्या ठरलेल्या वेळेपर्यंत शूट चालू ठेवलं.

निदर्शन करणाऱ्यांनी आरोप केला आहे की शाहरुख खान आणि पठाणच्या निर्मात्यांनी सिनेमात भगव्या रंगाचा अपमान केला आहे. आणि हे सहन केलं जाणार नाही. तसंच,त्यांनी पुढे मागणीही केली की पवित्र नदी नर्मदेच्या किनारी होणाऱ्या अशा लोकांच्या सिनेमांचे शूट यापुढे बंद पाडले जाईल. तसंच ज्या ठिकाणी शाहरुख शूट करत आहे ते ठिकाण गोमुत्र शिंपडून शुद्ध केलं जाईल. भेडाघाटमध्येच नाही तर लखनौ मध्ये देखील पठाणच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत.

माहितीसाठी इथे सांगतो की,शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाणं रिली झालं आणि सगळा वाद सुरू झाला. शिल्पा राव,कार्लिसा मोंटेइरो,विशाल आणि शेखरच्या आवाजात हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं ते खरंच खूप श्रवणीय अनुभव देतं. गाण्याचं लोकेशनही नजरेचं पारणं फेडतं. तर दीपिकाच्या वेगवेगळ्या रंगातल्या बिकिनी देखील नजरेला खटकत नाहीत,कारण दीपिका खरंच तिच्या परफेक्ट फिगर मुळे त्यात खूप सुंदर दिसतेय. पण यापल्याड जाऊन विरोधकांनी भगव्या रंगाच्या बिकिनीवरनं वाद उकरुन काढला आहे. हिंदू संघटनांनी तर सोशल मीडियावर याविरोधात तुंबळ युद्ध सुरु केलंय. हिंदू धर्माच्या भावना भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे दुखावल्या गेल्याचा आरोप केला गेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने