कुंभमेळ्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही : मंत्री भागवत कराड

नाशिक : रामायण, महाभारत काळातही नाशिकचे मोठे महत्त्व होते, ते अद्यापही टिकून आहे. येथील प्राचीन गोदावरीचे महत्त्व खूप मोठे आहे. शहरात २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत असून, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून भरीव मदत मिळेल. कुंभमेळ्यासाठी पैसे कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी रविवारी (ता. ८) दिली. गणेशवाडी परिसरातील श्रीराम वाचनालयाच्या प्रांगणात एकदिवसीय वारकरी स्नेहसंमेलन झाले, त्या वेळी वारकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री कराड यांनी केंद्रात व राज्यात वारकरी विचारांचे सरकार असून, संप्रदायासाठी शासनाचे मानधन मिळवून देण्याबरोबरच संत साहित्य उपलब्ध करून देणे आदी चारही मागण्यांचा केंद्रासह राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. संमेलनात महत्त्वाचे ठरावही पारित करण्यात आले.

गंगाधर महाराज कवडे यांच्या हरिकीर्तनाने संमेलनाचा प्रारंभ झाला. त्र्यंबक गायकवाड संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. आयोजक माजी आमदार बाळासाहेब सानप, डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर, आमदार श्रीकांत भारतीय, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, माधव महाराज घुले, दामोदर महाराज गावले, डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, निवृत्ती महाराज गावित, पुंडलिक थेटे, संयोजन समितीचे तुकाराम महाराज मगर, ज्ञानेश्‍वर निमसे, वारकरी महामंडळाचे प्रचारप्रमुख राम खुर्दळ आदी उपस्थित होते.






सुषमा अंधारे यांचा निषेध

संमेलनात अनेकांनी मते मांडली. काही वक्त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्या वारकरी संप्रदायाबाबतच्या केलेल्या कथित उद्‌गाराबाबत त्यांचा निषेध केला. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची शासनाने दखल घ्यावी, अशी मागणीही केली.

संमेलनातील ठराव-

१) नाशिकमध्ये वारकरी भवन व्हावे.

२) त्र्यंबकेश्‍वर, नाशिक येथे संतपीठाची स्थापना.

३) संत वाङ्मय फिफायतशीर दरात उपलब्ध व्हावे.

४) कीर्तनकार, कथाकारांनी आचारसंहिता पाळून निरूपणे करावीत.

५) मुक्या प्राण्यांची पशुहत्या थांबवा, तीर्थक्षेत्रे व्यसनमुक्त व्हावीत.

६) ब्रह्मगिरीचे उत्खनन थांबवावे.

७) संत निवृत्तिनाथ पालखीमार्ग गॅझेटमध्ये यावा.

८) निवृत्तीनाथ महाराज पालखीचा प्रचार, प्रसार व्हावा.

पुरस्कारार्थी असे

सुदाम महाराज काळे (धारणगाव, सिन्नर), कैलास भाऊसाहेब देशमुख (मंगरूळ, चांदवड), यशोदाअक्का जायखेडकर (सटाणा), रेणुकाताई वासुदेव गायकवाड (नाशिकरोड), निवृत्ती महाराज घोरवडकर

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने