वाघांच्या सुरक्षेसाठी ‘निवारे‘ वाढविणार ; केंद्राची योजना तयार

नवी दिल्ली : देशातील वाघांची संख्या लक्षणीयरीत्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार देशातील ‘टायगर कॉरिडॉर' ची संख्या सध्याच्या ३२ वरून किमान ६ ते ७ ने वाढविणार आहे. २०१८ च्या जनगणनेनुसार देशात २९६७ वाघ आहेत. ते ५४ व्याघ्र प्रकल्प आणि ३२ कॉरिडॉरमध्ये रहातात. सध्याच्या गणनेत वाघांची संख्या दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. पर्यावरण व वन्यजीव मंत्रालयाने त्यांचे अपघाती मृत्यू व शिकारी रोखण्यासाठी त्यांचे ‘निवारे‘ वाढविण्याची योजना अंतिम टप्प्यात आणली आहे.राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत वाघांच्या ‘लोकसंख्या व्यवस्थापना‘ वर विस्ताराने चर्चा करण्यात आली.



 त्यात बिहार, ओडिशा, मिझोराम, झारखंड, केरळ यांसारख्या राज्यांच्या वनक्षेत्रात कॉरिडॉरचा विस्तार करण्याच्या शक्यतांवर चर्चा करण्यात आली आणि राजस्थानमधील कुंभलगडला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यासाठी ही बाब पुन्हा राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्याचे मान्य केले.महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील वनक्षेत्रात व्याघ्र कॉरिडॉरच्या विस्ताराच्या शक्यतांवरही चर्चा करण्यात आली. देशात गेल्या एका वर्षात मृत्युमुखी पडलेल्या ११६ वाघांपैकी बहुतांश वाघांना अपघात आणि शिकारीच्या घटनांमुळे जीव गमवावा लागला होता. व्याघ्र कॉरिडॉरच्या विस्तारामुळे वाघांचे संवर्धनही करू शकतील. सध्या देशात ३२ व्याघ्र कॉरिडॉर आहेत.जेथे वाघांची संख्या जास्त आहे तेथून त्यांचे प्रमाण कमी असलेल्या अधिवासांत त्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया वेळोवेळी केली जाते. प्रस्तावित कॉरिडॉरचा विस्तार योग्य पद्धतीने झाल्यास वाघांची संख्या वाढण्याबरोबरच त्यांच्या संवर्धनाचा मार्गही सुकर होईल असे मंत्रालयाला वाटते. वन्यजीव मंत्रालयाच्या वतीने राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटक अभयारण्यांमधील वाघांचे कमी संख्येच्या व्याघ्र प्रकल्पांतील स्थलांतर सध्या सुरू आहे. हलवत आहे. त्यानुसार काही वाघांना, विशेषतः नर वाघांना सातपुडा, मुकुंद्रा हिल्स, सरिस्का आणि विषधारी व्याघ्र प्रकल्पात हलविण्यात आले आहेत.

वाघोबा...कुठे किती ?

मध्य प्रदेश सर्वाधिक ५२६

कर्नाटक ५२४

उत्तराखंड ४४२

महाराष्ट्र ३१२

तामिळनाडू २६५

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने