शतकाच्या अखेरीस ८० टक्के हिमनद्या नष्ट

न्यूयॉर्क : जीवाश्‍म इंधनाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरुच राहिल्यास या शतकाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात असलेल्या एकूण हिमनद्यांपैकी ८० टक्के हिमनद्या नष्ट होतील, असा इशारा एका अभ्यास अहवालाद्वारे देण्यात आला आहे. हवामान बदलाच्या वेगानुसार, या शतकाच्या शेवटाला हिमनद्यांच्या एकूण आकारमानापैकी २६ ते ४१ टक्के आकारमान घटेल, असा अंदाज आहे.अमेरिकेतील कार्निज मेलॉन विद्यापीठातील पर्यावरण अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक डेव्हिड रौंस यांच्या अध्यक्षतेखालील संशोधकांनी हा अभ्यास अहवाल तयार केला आहे. हरितगृह वायूंच्या उत्सर्जन होण्याच्या संभाव्य प्रमाणानुसार हिमनद्यांचे आकारमान किती घटेल, याचा अंदाज अभ्यास अहवालात मांडण्यात आला आहे.



हा अहवाल तयार करताना जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या संभाव्य बदलांचाही परिणाम लक्षात घेण्यात आला आहे. तापमानवाढ रोखण्याचे कसोशीने प्रयत्न झाले तरीही, म्हणजे हरितगृह वायूंचे कमीत कमी उत्सर्जन होऊन तापमानवाढ दीड अंश सेल्सिअसपर्यंतच मर्यादित राहिली, तरीही हिमनद्यांचे २५ टक्के आकारमान घटेल आणि ५० टक्के हिमनद्या नाहीशा होतील, असा अंदाज अहवालात मांडण्यात आला आहे.नाहीशा होण्याची शक्यता असलेल्या हिमनद्यांमध्ये एक चौरस किलोमीटरपेक्षा कमी आकारमान असलेल्या छोट्या हिमनद्यांची संख्या अधिक असेल. या हिमनद्या छोट्या असल्या तरी त्या नष्ट झाल्याने स्थानिक भागातील जलचक्रावर,पर्यटनावर आणि मानवी संस्कृतीवरही विपरीत परिणाम होईल, असा इशारा अहवालात देण्यात आला. मध्य युरोप, कॅनडाचा पश्‍चिम भाग व अमेरिकेत अशा हिमनद्यांची संख्या अधिक असल्याने याच भागाला फटका बसू शकतो.

प्रभाव धिम्या गतीने

वातावरणातील बदलाचा हिमनद्यांवर अत्यंत धिम्या गतीने प्रभाव पडतो, असे प्रा. डेव्हिड रौंस यांनी सांगितले. हिमनद्या या अत्यंत संथगतीने वाहणाऱ्या नद्या असतात. हरितगृह वायूंचे उत्सर्जन आता कमी केले तरी, त्यामुळे यापूर्वी हवेत मिसळलेले वायू काढून टाकले जाणार नाहीत.त्यामुळे हवेत आधीपासूनच असलेल्या हरितगृह वायूंमुळे पर्यावरणावर होत असलेला परिणामही अचानक थांबणार नाही. म्हणजेच, उत्सर्जन थांबविले तरीही त्याचा हिमनद्यांवर सकारात्मक परिणाम होण्यास ३० ते १०० वर्षे लागतील, अशी माहिती अभ्यास अहवालात देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने