जुन्या कागदपत्रांवरून बायडेन अडचणीत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या पूर्वीच्या खासगी कार्यालयामध्ये काही सरकारी कागदपत्रे सापडल्याचे उघड झाले आहे. या प्रकाराबाबत आपल्यालाही आश्‍चर्य वाटत असून ती कागदपत्रे कशासंदर्भात आहेत, हे माहिती नाही, अशी प्रतिक्रिया बायडेन यांनी दिली आहे. रिपब्लिकन पक्षाने बायडेन यांच्यावर टीका केली आहे.बायडेन हे २०१७ ते २०२० या कालावधीत वापरत असलेल्या पेन बायडेन सेंटर या कार्यालयात ही कागदपत्रे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आढळून आली आहेत. बायडेन हे उपाध्यक्ष असतानाच्या काळातील ही कागदपत्रे असून ती विविध देशांबाबतच्या धोरणांची टिपणे असल्याचे समजते.बायडेन यांनी गुप्तचरांकडून बेकायदा पद्धतीने माहिती मिळविल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याबाबत रिपब्लिकन पक्षाची संसदीय समिती तपास करणार असल्याचे या समितीतर्फे सांगण्यात आले. अमेरिकेच्या विधी विभागातर्फेही या प्रकरणाचा अभ्यास केला जाणार आहे. अशी कागदपत्रे मिळाल्याबद्दल बायडेन यांनीही आश्‍चर्य व्यक्त केले आहे.

तपास संस्थांना आपण पूर्ण सहकार्य करत आहोत, असे त्यांनी सांगितले. सूत्रानुसार, बायडेन यांच्या जुन्या कार्यालयात एकूण १० फाइल सापडल्या आहेत. त्यामध्ये विविध देशांशी संबंधी टिपणे असलेली कागदपत्रे, गुप्तचरांनी दिलेली माहिती, युक्रेनसह इराण आणि ब्रिटनमधील घडामोडींशी संबंधित माहिती असलेली कागदपत्रे आहेत.या कागदपत्रांमध्ये अण्वस्त्रांसंबंधी काहीही नाही, असे सूत्रांनी सांगितले. बायडेन यांचा संबंध असलेल्या इतर कार्यालयांमध्येही अशी कागदपत्रे आहेत का, याचा तपास केला जात आहे.




रिपब्लिकन पक्षाकडून टीका

रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कार्यकाल संपल्यानंतर काही संवेदनशील कागदपत्रे फ्लोरिडा येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी नेली होती.त्याची चौकशी सध्या सुरु असतानाच बायडेन यांच्या जुन्या कार्यालयात गोपनीय कागदपत्रे सापडल्याने रिपब्लिकन पक्षाला टीकेची आयतीच संधी मिळाली आहे. ट्रम्प यांना ‘अत्यंत बेजबाबदार’ असे संबोधणारे बायडेनही तसेच आहेत, अशी टीका रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

कागदपत्रांमधील फरक

डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन या दोघांच्या खासगी निवासस्थानी सरकारी कागदपत्रे सापडली असली तरी, ट्रम्प यांच्याकडील तीनशेहून अधिक कागदपत्रांवर गोपनीय असल्याचा शिक्का होता. त्यातील १८ कागदपत्रे ‘अत्यंत गोपनीय’ अशी होती.चौकशीदरम्यान ट्रम्प यांनी फारसे सहकार्यही केले नव्हते. बायडेन यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी झालेली नसली तरी, ती फारशी गोपनीय नसल्याचे सांगितले जाते. त्यात काही खासगी कागदपत्रे असल्याचेही समजते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने