शरद पवार आमच्या पाठीशी, थोडा धीर धरा.. मविआ पुन्हा सत्तेत येईल; NCP प्रदेशाध्यक्षांचा दावा

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकार पंचायत समिती, जिल्हा परिषद व मुंबई महापालिका निवडणुका पुढे ढकलतेय. सरकार घाबरलेलं असून, सत्ता मिळाल्यापासून हुकूमशाही प्रवृत्तीनं वागत आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलाय.काळोली (ता. पाटण) येथे आयोजित ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायट्या यांच्या निवडणुकीतील विजयी व पराभूत उमेदवारांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे मीडिया सेल प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, राजाभाऊ शेलार, मोहनराव पाटील, बापूराव जाधव, विविध संस्थांचे पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.



काळ आणि वेळ बदलली, की सर्व काही ठीक होते. धीर धरा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपल्या पाठीशी उभे आहेत. कुटिल कारस्थानात आघाडी सरकार जसे गेलेले कळाले नाही. त्याचप्रमाणे काही कालावधीत आलेलेही कळणार नाही, असा विश्वासही आमदार पाटील  यांनी व्यक्त केला.पाटील पुढे म्हणाले, 'दडपशाहीला कंटाळून लोक सत्यजित तुम्हाला येऊन मतदान करतील. खोक्यांच्या पलीकडं जाऊन विचार न केल्यानं सत्तांतर झालं. सर्व व्यवस्थांवर दबाव आणला जात आहे. व्यवस्था खिशात घालून चाललेला कारभार पाटणवासीय भोगत आहेत. असा दबाव असतानाही कार्यकर्ते लढले. त्यांना धीर देण्यासाठी मी आलेलो आहे. निवडून आलेल्यांना निरोप येतील, आमिष दाखविले जाईल, त्यास भुलू नका.'

महापुरुषांची जाणीवपूर्वक बदनामी करून मुख्य प्रश्नांवरील लक्ष वळविण्याचा भाजप (BJP) प्रयत्न करत आहे. माणसांची डोकी भडकावली जात आहेत. मुख्यमंत्री यांच्यासह १६ जणांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते मुख्यमंत्री यांच्या डावी व उजवीकडील कधी अडचणीत येतात, याची वाट पाहात आहेत. मुख्यमंत्री ४० टिकवण्यासाठी धडपडत असून, मागेल त्याला देत आहेत. हे सरकार सर्वसामान्य जनतेच्या हिताचं नाही, असंही पाटील म्हणाले.विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘‘धमक्या, पैसा, घोषणा व आश्वासन याला भुलून जाऊ नका. खोक्यांच्या विरोधात आपण एकजुटीने लढलो. सहा वर्षांत झालेली कामे पावसाळ्यात उघडी पडलीत. दडपशाहीला विरोध करून आपणाला जनतेला न्याय द्यायचा आहे. कार्यकर्त्यांनी वाट चुकलेल्या आपल्या माणसांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ’’सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील यांनी या वेळी मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी स्वगत केले. जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. शंकरराव शेडगे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने