माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना मिळणार चिकन

बेळगाव : माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना काही दिवसांपासून अंडी, केळी, चिक्की, दूध यांचे वाटप केले जात आहे. यापुढील काळात माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन देण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून माध्यान्ह आहारात विद्यार्थ्यांना चिकन उपलब्ध होण्याची शक्यता आहे.सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहाराचे वितरण केले जाते. याचा बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यासह राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ मिळत आहे. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचा माध्यान्ह आहार मिळावा, यासाठी सरकारकडून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या योजना हाती घेतल्या जातात.



सुरुवातीला विद्यार्थ्यांना भात व आमटी, तर शनिवारी उपीट किंवा पुलावाचे वितरण केले जात होते. मात्र, त्यानंतर काही वर्षांनी माध्यान्ह आहाराबरोबरच विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोन वेळा दूध वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आठवड्यातून दोन वेळा विद्यार्थ्यांना दुधाचे वितरण केले जात आहे.तर सहा महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारात अंडी, चिक्की व केळी वितरण करण्याचा निर्णय घेत त्याचे वाटप सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून राज्यात अंडी व चिक्की खाण्यास विद्यार्थी अधिक पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.अंडी व चिक्की वितरण करण्याबरोबरच येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन उपलब्ध करून देण्याचा विचार सरकारने सुरू केला आहे.

चिकन खाण्याबाबत विद्यार्थ्यांवर सक्ती नाही

राज्यात अंडी वितरण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी याला विरोध दर्शवला होता. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना माध्यान्ह आहारात चिकनचे जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला, तर त्याला मोठा विरोध होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सरकारने याबाबत सर्वांची मते जाणून घेऊन अंतिम निर्णय घेण्याचा विचार सुरू केला आहे. मात्र, अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे केळी व चिक्कीचे वाटप केले जात आहे. त्याच प्रकारे चिकन खाण्याबाबत कोणावरही सक्ती केली जाणार नाही. असे अगोदरच स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने