LED मुळे जिल्‍ह्यातील पारंपरिक मासेमारी अडचणीत

अलिबाग : समुद्रात खुलेआमपणे एलईडीद्वारे मासेमारी करण्याचे प्रमाण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे समुद्रातील मासळीचे प्रमाण घटले असून पारंपरिक मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. जिल्ह्याला २४० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असून जवळपास ६,००० बोटी कार्यरत आहेत. पारंपरिक मासेमारीवर भर देत हजारो मच्छीमारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.याशिवाय मासेमारीशी निगडित अनेक व्यवसायिकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. परंतु काही महिन्यांपासून एलईडीमार्फत सर्रास मासेमारी केली जात आहे. त्‍यामुळे खोल समुद्रात गेले तरी पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना मासे सापडत नाहीत.समुद्रातील सुमारे ४० टक्के मासे एलईडी पद्धतीमुळे नष्ट होऊन उपासमारीची वेळ येण्याची शक्यता मच्छीमारांकडून वर्तवली जात आहे. एलईडी मासेमारीला बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन करीत मासेमारी केली जात आहे. प्रशासनाकडून कारवाई होत असली तरी काही दिवसांत पुन्हा परिस्‍थिती जैसे थे होत असल्‍याचे मच्छीमारांचे म्‍हणणे आहे.



७० बोटींवर कारवाई

1 बेकायदा मासेमारी करणाऱ्या ७० बोटींविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

2 एकूण नऊ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी साडेतीन लाख वसूल करण्यात आल्‍याची माहिती मत्स्य विभाग कार्यालयाकडून देण्यात आली.

एलईडी मासेमारीला बंदी आहे. तरीसुद्धा काही मंडळी बेकायदा मासेमारी करतात. एलईडी मासेमारीमुळे समुद्रातील मासळी नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे सरकारने व प्रशासनाने यावर कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.

- विजय गिदी, संचालक, महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघ

एलएडीमुळे लहान मासळी नष्ट होत आहे. मासळीची संख्या घटल्‍याने पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांवर संकट उभे आहे.

- अनिल भिंगारकर, अध्यक्ष,

माता टाकादेवी मच्छीमार संस्‍था, मांडवे

सरकारने एलईडी मासेमारीवर बंदी घातली आहे. अशा पद्धतीने जे मासेमारी करताना सापडतील, त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे. दंडही आकारण्यात आला आहे. पारंपरिक मासेमारी करण्यासाठी प्रबोधनही केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने