KDCC ची ED कडून ३० तास चौकशी; पाच गठ्ठे कागदपत्रे जप्त

कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक (केडीसीसी)ची चौकशी करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज बँकेच्या कार्यकारी संचालकांसह पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ईडीने बँकेतील काही कागदपत्रेही जप्त केली असून, तिही मुंबईला नेली. दरम्यान, तीस तास चौकशी करूनही बँक अधिकाऱ्यांना ताब्यात घेणाऱ्या ईडीविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली.

अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध दर्शवल्याने बँकेच्या दारात काही काळ गोंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बळाचा वापर करून हा विरोध मोडून काढला. त्यानंतर तीन गाड्यांत कागदपत्रांसह या अधिकाऱ्यांना मुंबईच्या दिशेने नेण्यात आले. तत्पूर्वी या सर्वांना ईडीने ताब्यात घेत असल्याचे समन्स बजावले होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ बँकेचे अध्यक्ष आहेत. बँकेने मुश्रीफ यांच्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला अर्थसाहाय्य केले आहे. महिन्यापूर्वी ईडीने मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह कारखाना, नातेवाइकांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर बुधवारी (ता. १) अचानक जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी (ता. कागल), हरळी (ता. गडहिंग्लज) शाखेवर छापा टाकला होता. ही चौकशी मध्यरात्री दीडपर्यंत सुरू होती. आज पुन्हा सकाळी नऊपासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी बँकेच्या कामाची चौकशी सुरू केली.

सायंकाळी पाचपर्यंत चौकशी सुरू होती. चौकशीत आक्षेपार्ह सापडलेल्या कागदपत्रांचे गठ्ठे चार ते पाच बॉक्समध्ये भरून ताब्यात घेतले आहेत. सायंकाळी सहाच्या सुमारास बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांच्यासह इतर पाच अधिकाऱ्यांना समन्स देऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले.या घटनेची माहिती समजताच कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते बँकेबाहरे जमा झाले. कर्मचारी संघटनेचे नेते कॉ. अतुल दिघे यांनी या कारवाईला तीव्र विरोध केला; पण विरोध मोडून काढत ईडीने अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी कर्मचाऱ्यांनी ईडीच्या निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.



बँकेची आर्थिक स्थिती भक्कम

जिल्ह्यातील विकास सेवा संस्थांसह इतर संस्थांची मातृसंस्था असलेल्या जिल्हा बँकेवर ही पहिलीच कारवाई आहे. बँकेवरील प्रशासक नियुक्तीचा कालावधी संपल्यानंतर मुश्रीफ आणि बँक कर्मचाऱ्यांनी बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून बँकेची आर्थिक स्थिती भक्कम झाली. या कारवाईने मात्र बँकेवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

४५ मिनिटांत मुंबईत कसे जाणार?

जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांना सायंकाळी पाच वाजता समन्स बजावले आणि ५ वाजून ४५ मिनिटांनी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे कोल्हापूरमध्ये असणारे अधिकारी ४५ मिनिटांत मुंबईमध्ये पोहचणार कसे, अशी चर्चा यावेळी सुरू होती.

कागदपत्रांचे पाच बॉक्स ताब्यात

तीस तास झालेल्या चौकशीनंतर पाच बॉक्स भरतील एवढी कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. चौकशी संपल्यानंतर बँकेतून सुरक्षारक्षकांच्या साहाय्याने ही कागदपत्रे चारचाकी वाहनात ठेवण्यात आली.

कोल्हापूर : जिल्हा बँकेवरील छाप्यानंतर ईडीचे अधिकारी कागदपत्रांचे बॉक्स घेऊन जाताना.

कोल्हापूर जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करताना कोणताही लाभ घेतलेला नाही. कर्ज पुरवठा नियमानुसार झाला आहे. बॅंकेला १५० कोटींचा नफा आहे. सहकार कायद्यानुसार एकही चौकशी झालेली नाही. रिझर्व्ह बँक, नाबार्डकडून कोणतीही तक्रार नाही. एखादा घोटाळा झाला तर ईडी येते; पण बॅंकेत तसे काहीही झालेले नाही.आधी एक चौकशी सुरू होती. मात्र, त्यालाही उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे इतर कोणतीही चौकशी करता येत नसतानाही जिल्हा बँकेत ईडी आली. त्यांचा हेतू काय आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. तीस तासांनंतरही त्यांचा तपास झालेला नाही. त्यामुळे ते अधिकाऱ्यांना घेऊन गेले आहेत.

- हसन मुश्रीफ, आमदार व बॅंकेचे अध्यक्ष

ताब्यातील अधिकारी

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, साखर कारखान्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी असलेल्या सीएमए सेलचे व्यवस्थापक आर. जे पाटील, उपव्यवस्थापक अल्ताफ मुजावर, बँक निरीक्षक सचिन डोणकर व राजू खाडे.

बॅंकेचे कामकाज आज १ तास उशिराने

उद्या (ता. ३) बॅंकेचे कामकाज एक तास उशिरा सुरू करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने जाहीर केला आहे. ईडीने बॅंकेच्या अधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने