'त्या' 11 दोषींच्या अडचणी वाढणार! आव्हान याचिकेला सुप्रीम कोर्टाची परवानगी

दिल्ली : बहुचर्चित बिल्किस बानो प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील ११ दोषींच्या मुक्ततेवर सुनावणीस परवानगी दिला आहे. तसेच ही सुनावणी विशेष खंडपीठासमोर घेण्यासही सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं होकार दिला आहे. बिल्किस बानो प्रकरणातील दोषींपैकी ११ दोषींची गुजरात सरकारनं मुदतीपूर्वीच मुक्तता करण्याचा निर्णय घेतला होता. मुक्ततेनंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर या दोषींचा हारतुरे देऊन सत्कार करण्यात आला होता. यावरुन मोठा गदारोळही झाला होता. गुन्हेगारांचं अशा प्रकारे उदात्तीकरण करण्यात आल्यानं गुजरात सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली होती.



दरम्यान, या अकरा आरोपींची मुक्तता करण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेत या प्रकरणातील प्रमुख पीडित बिल्किस बानो यांच्यावतीनं सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. या आव्हान याचिकेची सुप्रीम कोर्टानं दखल घेतली आहे.2002 साली गुजरात दंगलीमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची ऑगस्ट २०२२मध्ये सुटका करण्यात आली होती. गोध्रा येथील कारागृहात हे 11 दोषी शिक्षा भोगत होते. जन्मठेपेची शिक्षा माफ व्हावी असा अर्ज या दोषींनी केला होता. गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, तुरुंगातील त्यांची वागणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्यात आल्याचं गुजरात सरकारनं म्हटलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने