आधार-मतदान ओळखपत्र जोडण्याची मुदत पुन्हा वाढली; जाणून घ्या नवी तारीख

नवी दिल्ली : आधार क्रमांक आणि मतदान ओळखपत्र लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी १ एप्रिल २०२३ ही शेवटची तारीख होती, याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे.केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयानं याबाबत पत्रक काढलं असून त्यामध्ये आधार क्रमांक  आणि मतदान कार्ड जोडण्याची मुदत वाढवण्याबाबत कायद्यात बदल केल्याचं म्हटलं आहे. या बदलानुसार, यापूर्वी या जोडणीची मुदत १ एप्रिल २०२३ होती ती आता ३१ मार्च २०२४ करण्यात आली आहे.दरम्यान, या महिन्यात मुदत संपणार असल्यानं ती पुन्हा वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात होती.   त्यामुळं अपेक्षेप्रमाणं  ही  मुदतवाढ झाली आहे.



मोहिमेला महाराष्ट्रातून झाली होती सुरुवात

केंद्रीय निवडणूक आयोगानं महत्वाचा निर्णय घेत निवडणूक मतदान कार्डाशी आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आयोगाच्या या मोहिमेला १ ऑगस्ट २०२२ पासून सुरुवात झाली. देशभरात महाराष्ट्रातून या मोहिमेला सुरुवात झाली होती. आधार आणि मतदान ओळखपत्र लिंक केल्यामुळे मतदाराची ओळख पटवणं अधिक सोपं होणार असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं होतं."मतदारांची ओळख पटविण्यासाठी आणि मतदार यादी तपासण्यासाठी मतदार ओळखपत्र आधार क्रमांकाशी लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच व्यक्तीचं नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा नाव नोंदणी होणं असे प्रकार यामुळं टाळता येणार आहेत", असं महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी यापूर्वी सांगितलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने