साडेतीन महुर्त म्हणजे नेमकं काय? गुढीपाडव्याचं महत्त्व

मुंबई:  हुताशनी पौर्णिमा झाली की वेध लागतात ते गुढी पाडव्याच्या शुभ दिवसाचे. गुढीपाडवा म्हणजे साडेतीन महुर्तांमधला एक मुहुर्त. मात्र हे साडेतीन मुहुर्त म्हणजे नेमकं काय? पाडवा आणि या मुहुर्ताचं नेमकं काय नातं? या सगळ्याबद्दल जाणून घेऊ या लेखातून.

ब्रह्म ध्वज नमस्तेस्तू

सर्वभिष्ट फलप्रद|

प्राप्तेs स्मिन वत्सरे नित्यम

मद्गृहे मंगलंम कुरु||

वर्ष २०२३ मध्ये गुढी पाडवा बुधवारी २२ मार्चला आला आहे.

पूजा मुहूर्त सकाळी ६.२९ ते ७.३९ पर्यंत आहे. नवीन संवत्सर हे बुधवारी सुरू होत असल्याने याचा स्वामी बुध आहे. शक संवत १९४५ शोभन नाम असून याचे अतिशय उत्तम फळ आहे. या वर्षी सर्व शुभ फलात वाढ होईल. नैसर्गिक खनिज साठे ,पाणी, सर्व प्रकारचे धातू यांच्यात वृद्धी होईल. पाऊस उत्तम पडेल. एकूण सर्व बांधवांना आरोग्य,समृद्धी देणारे हे हिंदू नववर्ष प्रारंभ होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदा ,वसंत ऋतू चे आगमन झाले आहे .



साडेतीन मुहुर्त म्हणजे काय?

गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्वाचा मुहूर्त मानला जातो. साडेतीन मुहूर्त म्हणजे स्वयंसिद्ध मुहूर्त. कोणताही मुहूर्त काढण्यासाठी पंचांग शुद्धी,नक्षत्र शुद्धी तारा बल ,चंद्र बल पहावे लागते. पण काही दिवस असे आहेत की त्या दिवशी उत्तम तिथी, नक्षत्र आणि योग असा संयोग होतो. साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा,अक्षय तृतीया ,दसरा आणि बली प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त. या योगावर कुठलाही वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नसते. तसेच या दिवशी खरेदी केलेली संपत्ती अक्षय राहते किंवा वृद्धिंगत होते. त्यामुळे हे मुहुर्त साधून सोने चांदी घर वाहन आदी खरेदी आवर्जून केली जाते.

गुढी पाडव्याचं महत्त्व

प्रभू श्रीरामांनी लंकेत दसऱ्याला रावणाचा वध केला.त्यानंतर ते सीता आणि आपल्या बंधू बांधव मित्रा सह अयोध्येत प्रवेश करते झाले तो दिवस म्हणजे गुढी पाडवा. नूतन वर्षाचा प्रथम दिन. इथून पुढे सर्व मंगल घडेल असा विश्वास बाळगून या दिवशी सर्व नागरिकांनी अयोध्या नगरी ही ब्रह्म ध्वज लावून, तोरणे लावून सजवली. मंगल वाद्य वाजवून, रांगोळ्या घालून श्रीरामांचे स्वागत करण्यात आले.

मिष्टान्न भोजन केले. त्या दिवसाची आठवण म्हणून आजही आपण गुढी पाडव्याला गुढी उभारतो. पहाटे कडुलिंबाची कोवळी पाने चूर्ण करून खडीसाखर घालून खाल्ल्याने वर्ष भर आरोग्य उत्तम राहते. कडुलिंबाची पाने ही शीत ,जंतुनाशक आणि आरोग्य वृद्धी करणारी असल्याने ह्या दिवसात त्याची चटणी करून नियमित खाल्ली जाते.

घराची साफसफाई करून तोरण लावून आंब्याच्या डहाळ्या लावून घराचे प्रवेशद्वार सुशोभित केले जाते. पहाटे उठून गृहिणी सडा रांगोळी करतात. स्नान करून नवीन वस्त्र घालून गुढी उभारली जाते. चांदीचा किंवा तांब्याचा गडू किंवा कलश एका उंच काठीवर उपडा ठेवून त्याला रेशमी वस्त्र, साखरेची गाठी तसेच कडुलिंब, आंबा यांची पाने, फुले याने सुशोभित करून ती गुढी घराच्या बाहेर उंच उभारली जाते . 'ओम ब्रह्म ध्वजाय नमः 'असे म्हणून त्याचे यथायोग्य पूजन करून नैवेद्य केला जातो. त्यानंतर सायंकाळी तो मानाने उतरवला जातो.

ब्रम्ह ध्वज का म्हणतात?

या दिवशी ब्रह्माने विश्वाची उत्पत्ती केली म्हणून गुढी हा ब्रह्म ध्वज आहे शालिवाहन राजाने शकांचे पारिपत्य केले त्या स्मरणार्थ हिंदू नव संवत्सर शालिवाहन शक म्हणून ओळखले जाते. जे गुढीपाडव्याला सुरू होते. या दिवशी नूतन पंचांगाचे पूजन करून फल श्रवण करावे. त्याचे फार महत्व सांगितले आहे.नवीन संवत्सर सुरू होत असताना पंचांगातील फळ श्रवण करावे. राजाचे फळ श्रवण केले असतं वैभव प्राप्त होते.प्रधानाचे फळ श्रवण केले असता कौशल्य प्राप्त होते. प्रतिवर्षी पुण्यकारक अश्या चैत्र महिन्यात फल श्रवण केल्याने आरोग्य, लक्ष्मी, बुद्धी,स्थैर्य प्राप्त होते व सर्व पापक्षालन होते.

सूर्य संवेदना पुष्पे:, दीप्ति कारुण्यगंधने|

लब्ध्वा शुभम् नववर्षेअस्मिन् कुर्यात्सर्वस्य मंगलम् !

सांप्रत काळात देखील अतिशय उत्साहाने हा सण साजरा केला जातो. हा अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त आहे त्यामुळे यादिवशी महत्वाच्या कामांचा शुभारंभ, घर.,वाहन इत्यादी खरेदी फार मोठ्या प्रमाणात केली जाते. सुवर्ण खरेदीचा देखील उत्तम मुहूर्त असून या दिवशी बाजारपेठेत मोठी उलाढाल होते.

चैत्र नवरात्र म्हणजे काय?

चैत्र महिना हा मराठी महिन्यातील प्रथम असून चैत्र शुक्ल प्रतिपदे पासून चैत्र नवरात्र प्रारंभ होते. या दिवशी जगदंबेची सर्व ठिकाणी मनापासून स्थापना व पूजन नऊ दिवस केले जाते. या महिन्यात सर्वात महत्वाचा सण म्हणजे श्रीरामनवमी. चैत्र शुक्ल नवमीला दुपारी १२ वाजता प्रभू श्रीराम अयोध्येत जन्म घेते झाले. आजही संपूर्ण देशभरात हा दिवस अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. चैत्र पौर्णिमा म्हणजेच हनुमान जयंती. या दिवशी पहाटे हनुमान जन्म होतो. असा हा पवित्र, सणानी भरलेला महिना आहे.

चैत्र नवरात्रात कोणते श्रवण-पठण?

या नऊ दिवसात केलेले सर्व शुभ कर्म हे अनेक पटीने फलदायी ठरते. श्री रामरक्षा स्तोत्र पठण हे रोज करावे. सिद्ध रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने आरोग्य प्राप्ती होते. तसेच क्लेश नाश होतो. सुंदरकांड पाठ करावा. श्री सप्तशती पाठ देखील उत्तम फळ देईल. अत्यंत पवित्र आचरण, मंत्र जप, हवनादी कार्य या काळात करावे.

निसर्गनियमांची जोड

हिंदू संस्कृती ही आपल्याला निसर्ग संवर्धन, पूजन आणि शुद्ध आचरण शिकवते. त्यानुसार येणारे सण हे ऋतू, काळ आणि पर्यावरण यास अनुकूल असतात. त्या त्या ऋतूनुसार मानवणारे खाद्य पदार्थ केले जातात. संपूर्ण उन्हाळा शीतल व्हावा म्हणून कैरी, साखरेच्या गाठी यांचा वापर केला जातो.

ही एक समृद्ध , विज्ञाननिष्ठ परंपरा आहे. त्याचे पालन करणे, निसर्गाचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.

हिंदू संस्कृतीचे प्रतीक असलेले हे सण आवर्जून साजरे करावे.

सर्व हिंदू बांधवांना ह्या मंगल पर्वाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने