मुश्रीफांनी ४० हजार शेतकऱ्यांना उत्तर द्यावे

कोल्हापूर: ‘चाळीस हजार शेतकऱ्यांनी ४० कोटी रुपये आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या शेअर्सपोटी दिले. शेतकऱ्यांचे शेअर्सचे पैसे कारखान्याच्या बँक खात्याच्या तपशिलात दिसत नाहीत. दहा दिवसांपूर्वी मुश्रीफांना हे पैसे कुठे गेले? असा प्रश्न विचारला होता. याबाबतीत ते काहीच बोलत नाहीत. मुश्रीफांनी ‘संताजी’च्या सभासद शेतकऱ्यांना उत्तर द्यावे. हे ४० कोटी रुपये गेले कोठे?,’ असा सवाल शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आमदार हसन मुश्रीफ यांना केला.सावर्डे खुर्द (ता.कागल) येथे एक कोटी पंधरा लाख रुपयांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत मंजूर नळपाणी पुरवठा योजनेचे उद्‌घाटन व बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भवानी सेवा संस्थेचे चेअरमन आनंदराव डाफळे होते.



घाटगे म्हणाले, ‘सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना हा ४० हजार शेतकऱ्यांचा असल्याचे ते वारंवार म्हणतात. मग त्यांच्या आवाहनानुसार ४० हजार शेतकऱ्यांनी विश्वासाने शेअर्ससाठी ४० कोटी रुपये दिले. हे शेतकरी या कारखान्याला सभासदच नाहीत. उलट मुश्रीफ यांच्या कुटुंबातील व्यक्ती व काही कंपन्याच या कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये आहेत. ज्या विश्वासाने शेतकऱ्यांनी त्यांना शेअर्सपोटी इतकी मोठी रक्कम दिली. त्या ४० हजार शेतकऱ्यांचा त्यांनी विश्वासघातच केला आहे.’प्रास्ताविक उपसरपंच हिंदूराव मालवेकर यांनी केले. या वेळी बिद्रीचे संचालक बाबासाहेब पाटील, आनंदराव डाफळे, भाजप तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक सचिन मगदूम, सरपंच लक्ष्मी डाफळे, उत्तम पाटील,भाऊसो कांबळे, दिनकर वाडकर, चंद्रकांत दंडवते, राजेंद्र जाधव उपस्थित होते. आभार गुरुप्रसाद डाफळे यांनी मानले.

संचालक... सभासद तरी आहेत का?

‘तालुक्यातील काही मंडळी घोरपडे कारखान्याचे संचालक असल्याचे विविध कार्यक्रमातून मिरवतात. मात्र या मंडळींनी आपण या कारखान्याचे सभासद तरी आहोत का, याची खातरजमा करावी,’ अशी कोपरखळी घाटगे यांनी यावेळी मारली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने